जळगाव : शहरातील विसनजी नगरात स्व. कांतिलाल वेद यांनी ५० वर्षांपूर्वी महादेव मंदिराची स्थापना केली. नंतर १९९५ च्या सुमारास राधेश्याम कोगटा यांनी या जागेत गणपती मंदिराची स्थापना केली आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर जळगावकरांना मिळाले. या मंदिरात आजही वेद यांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेले शिवलिंग आहे. तसेच नंतरच्या काळात ट्रस्टने स्थापना केलेल्या गणेशमूर्ती देखील आहे.
या मंदिरात दोन गणेशमूर्ती आहेत. त्यात एक मूर्ती ही उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती पूर्वी मंडळातर्फे बसवली जात होती. नंतरच्या काळात त्याऐवजी शाडू मातीची मूर्ती मंडळात बसवली जाऊ लागली. या मंदिरात चार पुजारी आहेत. सुनील बारपांडे, प्रमोद जोशी, रवींद्र नांदे आणि भुषण पाठक दररोज पूजा-अर्चा करतात. तर ट्रस्टवर राधेश्याम कोगटा, रजनीकांत शहा, रोहन बाहेती, मनोज चौधरी, श्रीनिवास व्यास, रेखा जॉनी, सुनील बारपांडे, रवींद्र नांदे, कल्पेश वेद, देविचंद वेद आणि सतीश कोगटा हे ट्रस्टी आहेत.
पूर्वीचे महादेव मंदिर हे खासगी होते तर आताचे गणपती मंदिर हे ट्रस्टकडे आहे. याठिकाणी अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती आणि गणेशोत्सवातील दहाही दिवस मोठी गर्दी असते.