नगरदेवळा, ता. पाचोरा : तितूर नदीला दि. ३१ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात तीन वर्षांपूर्वीच तयार झालेल्या नगरदेवळा स्टेशनजवळील मोठ्या पुलाचा जोड भरावासह वाहून गेला व ठेकेदाराचे पितळ उघडे पडले. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तितूर नदीचा पूर मात्र कमी होत नसल्याने व लहान फरशीवर चार ते पाच फुटपाणी असल्याने नगरदेवळाशी संपर्क खंडित आहे. मात्र शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, व्यापारी बांधव, व शेतकऱ्यांना आपल्या कर्तव्यासाठी प्रवास करावाच लागतो. यासाठी सांगवी व परीसरातील तरुणाई मोटरसायकल खालच्या पुलावरून मोठ्या पुलावर चक्क खांद्यावर चढवून सेवा करीत आहेत.
काही प्रवाशी प्रेमाने खुशाली म्हणून पैसे देउन जात आहेत. मात्र पैशांपेक्षा पाचोरा गाळणमार्गे ५० किमी फेऱ्या पेक्षा कर्तव्याच्या जागी ५ किमी अंतरातूनच वेळेवर पोहचता येत असल्याने मोटरसायकल चालक ठेकेदाराच्या नावाने खडे फोडत मदत करणाऱ्या तरुणांप्रती समाधान व्यक्त करीत आहेत.