स्टार ९८६
जळगाव : भाजी बाजारात असलेले भाजीपाल्याचे भाव व घराजवळ विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याच्या भावात मोठी तफावत असल्याने ग्राहकांची एक प्रकारे लूट होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या भागांत जाऊन भाजीपाला विक्रीसाठी खर्च येत असल्याने भाज्यांचे भाव जास्त राहत असल्याचे कारण विक्रेते सांगतात.
कोरोनाचा संसर्ग उद्भवला आणि अनेकांच्या हातचे काम जाण्यासह वेगवेगळे व्यवसाय ठप्प झाले. त्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला व्यवसाय सुरू राहिला. त्यामुळे अनेक जण भाजीपाला व्यवसायाकडे वळले. परिणामी पूर्वी ज्या भागात कधी भाजीपाला विक्रेते जात नव्हते, त्या भागातही भाजीपाला विक्रेत्यांचा आवाज येऊ लागला. घराजवळच भाजीपाला मिळत असल्याने अनेक गृहिणीदेखील दारावर विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करू लागल्या. घराजवळ विक्रीसाठी येणाऱ्या या भाजीपाल्याचे भाव जास्त असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक जण घराजवळ भाजीपाला खरेदी करणे पसंत करीत असल्याचे दिसून आले.
अयोध्यानगरात कांदा ३५ रुपये किलो
भाजीपाला विक्रेत्यांना जागा दिलेल्या शिवतीर्थ मैदानावर व शहरातील इतर भागांतील भाजीपाल्याच्या भावातील तुलना केली असता मोठी तफावत आढळून आली. शिवतीर्थ मैदानावर कांदा २५ रुपये प्रतिकिलो असताना अयोध्यानगरात कांदा ३५ रुपये प्रतिकिलोने विक्री होत असल्याचे आढळून आले.
पिकवितात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हाती!
- भाजीपाला उत्पादनात जिल्ह्यातील वेगवेगळे भाग वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी ओळखले जातात. त्या-त्या भागात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. मात्र, त्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही.
- जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून, तसेच मराठवाड्याच्या काही भागांतून भाजीपाल्याची आवक होते. या ठिकाणी लिलाव होऊन भाजीपाल्याचा भाव शेतकऱ्यास कमीच मिळतो.
- येथे खरेदी केलेला भाजीपाला विक्रेते भाजी मंडीत अथवा वेगवेगळ्या भागांत जाऊन विक्री करीत असतात. त्यावेळी त्याचे भाव दीड ते दोनपट झालेले असतात. एकूणच शेतकऱ्यास भाव मिळत नाही. मात्र, घराजवळ विक्री करणाऱ्यास अधिक नफा मिळतो.
अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !
घराजवळ भाजीपाला विक्रेते येतात. त्यांच्याकडून भाजीपाला घेत असतो. गावात भाज्यांचे दर कमी आहेत. मात्र, भाडे अथवा इंधन खर्च करून जाणे व वेळही पाहता परवडत नाही. त्यामुळे घराजवळ खरेदीस पसंती असते.
- छाया बोरसे, गृहिणी
भाजी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी जायचे म्हटल्यास रिक्षाचे भाडे जाते. शिवाय वेळ जातो. त्यात कोरोना संसर्गाची भीती असल्याने घराजवळ येणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करते. थोड्या भाजीपाल्यासाठी खरेदीला जाणे परवडत नाही.
- मंगला सोनवणे, गृहिणी
एवढा फरक कसा?
भाजीपाला खरेदी करताना बाजार समितीमध्ये अधिक भाव द्यावा लागतो. यात अडते व इतर शुल्क लावले जाते. हा माल वेगवेगळ्या भागांत विक्रीसाठी जायचे झाल्यास आता दुचाकीचा वापर केला जातो. वाहनालाही इंधन लागते.
- रमेश महाजन, भाजीपाला विक्रेते
बाजार समितीमधून भाजीपाला आणताना त्याचे भाडे, बाजार शुल्क मोजावे लागते. त्यानंतर स्वत:चा नफा असे एकूण रक्कम वाढत जाऊन भाजीपाल्याचा दर अधिक वाटतो.
- गणेश चौधरी
हा बघा दरांमधील फरक (प्रति किलो दर)
भाजीपाला-शिवतीर्थ मैदान-घराजवळ
कांदा-२५-३५
बटाटे-२०-२५
टोमॅटो-३०-४०
कोथिंबीर-१००-११०
मेथी-८०-९०
मिरची-४०-५०
गिलके-४०-५०
शेवगा-५०-६०
भेंडी-३०-४०
सिमला मिरची-४०-५०
पत्ताकोबी-२५-३५
फुलकोबी-४०-५०