रावेर : सन २०२० /२०२१ च्या जि. प. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्तावाची मागणी केल्याबाबत व प्रस्ताव जि. प. कडे सादर करण्याबाबत पं. स. सभागृहाला अंधारात ठेवल्याबाबत व सभापतींची प्रस्तावावर स्वाक्षरी घेतांना त्यांनाही संबंधित शिक्षकाची माहिती न दिल्याचा आरोप दस्तुरखुद्द सभापती कविता कोळी व पं. स. सदस्यांनी केल्याने गटशिक्षणाधिकारी दखने यांनी चक्क सभागृहाची माफी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रावेर पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी सभापती कविता कोळी होत्या. या बैठकीत पं.स. सदस्य जितेंद्र पाटील व दीपक पाटील यांनी तालुक्यातील वादळी पावसाने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना कोकणच्या फळबागायदारांप्रमाणे नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. मात्र, आजतागायत तौक्तेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील या केळी उत्पादकांना आर्थिक मदत प्राप्त झाली नसल्याने सदरची मदत तातडीने अदा करण्यात यावी, असा ठराव संमत करून शासनाकडे अग्रेषित करण्याची मागणी त्यांनी केली.
निंबोल गावातील अतिउच्च दाबाची वीजवाहिनी गावाबाहेरून टाकण्यासंबंधी महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याबाबत पं. स. सदस्य जितेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तत्संबंधी मात्र जिल्हा नियोजन समितीकडे तत्संबंधी अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी सर्व विभागप्रमुखांमार्फत आढावा सभागृहात सादर केला. यावेळी उपसभापती धनश्री सावळे, पं. स. सदस्य पी. के. महाजन, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, योगेश पाटील, रूपाली कोळी आदी उपस्थित होते.