लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत मिळावी यासाठी भारतीय किसान संघाने बुधवारी देशव्यापी आंदोलन छेडले. त्याला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात उत्पादन बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केले तरी घोषित केलेल्या फायदेशीर किमतीवर विकले जाईल, घोषित किमतीपेक्षा कमी किमतीस व्यवहार झाल्यास तो गुन्हा मानला जावा, तसेच त्यासाठी कठोर कायदा करावा, तसेच फायदेशीर किमतीसाठी कायदा करावा; अन्यथा भारतीय किसान संघ प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर बडगुजर, महामंत्री वैभव महाजन, प्रांत कार्यकारिणी सदस्या कपिला मुठे, जिल्हा जैविक शेतीप्रमुख डॉ. दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष शिवराम महाले, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, रतीलाल कोळी, सतीश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत नेवे, भगवान न्हायदे, अमोल पाटील, प्रेमचंद भारंबे, अनुप पाटील, प्रतीक पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद महाजन, श्रीकांत श्रीखंडे, ॲड. दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती.