जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या फॉर्म नंबर सतरा भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सन २०२२ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा व माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस खाजगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नं.१७) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येतील. याच कालावधीत ऑनलाईन शुल्कही विद्यार्थ्यांना भरावयाचे आहे. १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी, शुल्क जमा केल्याबाबत पोहच पावतीच्या दोन छायांकित प्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावयाचे आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहच पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे.