चाळीसगाव/ भडगाव, जि. जळगाव : मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे, ता. चाळीसगाव तसेच कजगाव, ता. भडगाव या दोन गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तसेच या पावसामुळे अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.
कजगाव नागद रस्त्यावरील पुलाचा भराव पुन्हा वाहून गेला. यामुळे नागद मार्गावरील अनेक गावाचा कजगावचा संपर्क तुटला आहे.
मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
नांद्रे ग्रामस्थांसाठी रात्र ठरली वैऱ्याची
पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नांद्रे, ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारची रात्र वैऱ्याची ठरली. संपूर्ण गावाला पुराने वेढा दिल्याने अनेकांची गुरे, पत्र्याचे शेड, इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मरसह वीज तारा वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, मका, पपई पीक वाहून गेले. ५० वर्षांत असा पूर पाहिला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत डोंगरी व तितूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कजगाव, ता.भडगाव तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे गावाला पाण्याने वेढा दिला होता, तर कजगाव - नागद हा मार्ग बंद पडला आहे, तर जुनेगाव नवेगाव हा मार्ग देखील पाच ते सात तास बंद पडला होता. पहाटे चार वाजेपासून तितूर नदीच्या पुराचे पाणी वाढू लागले आणि काही वेळातच कजगाव-नागद मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद पडला. पुराचा प्रवाह जोरात असल्याने या पुराच्या पाण्याने सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर महादेव मंदिर यांना वेढा घातल्यानंतर पुराच्या पाण्याने गावास वेढा घातल्याने जुनेगाव - नवेगाव हा मार्ग देखील पाच ते सात तासांपर्यंत बंद पडला होता.
खान्देशातील लोकशाहीर व नगरदेवळा, ता. पाचोरा येथील रहिवासी शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर पावसामुळे कोसळले आहे.