आदिवासी कोळी महासंघातर्फे शेतकऱ्यांचा गौरव
जळगाव : आदिवासी कोळी महासंघातर्फे तालुक्यातील देऊलवाडे येथे बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष मुकेश सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, रामकृष्ण जाधव, राजू सोनवणे यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानाचा बैल म्हणून शेतकरी जितेंद्र सोनवणे यांच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकाविला तर योगेश सोनवणे यांच्या बैलाने दुसरा क्रमांक पटकाविला. तर दुसरा पोळा फोडणारे वैभव सोनवणे यांना प्रथम तर मयुर सोनवणे यांना द्धितीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
चौबे मार्केटसमोर वाहतुक कोंडी
जळगाव : शहरातील चौबे मार्केट समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधुन करण्यात येत आहे.
विनामास्क धारक नागरिकांवर कारवाईची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, शासनातर्फे सर्व बाजारपेठ अनलॉक करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही विनामास्क फिरतांना आढळून येत असून, परिणामी कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी मनपा प्रशासनाने विनामास्क धारक नागरिकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.