येथील पंचायत समिती कार्यालयाच्या पुढे शाळा क्र. ३ जवळ गणेश मूर्ती विक्रीचे स्टाॕॅल लावण्यात आले असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सकाळपासूनच बालगोळांसह नागरिकांनी बाजारात विनायकाची मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पूजा साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.
चाळीसगाव शहर व तालुका परिसरात आठ दिवसांच्या अंतराने ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नद्यांना मोठे पूर आले. या पुरात हजारो हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले आहे.
पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसले. दुकानदारांनाही पुराचा मोठा फटका बसला असून पशुहानीसह अनेकांची घरे वाहून गेली आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यावर दुःखाचे सावट असताना दुःखहर्त्या बाप्पाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काहीशी ऊर्जा संचारली असून घराघरांमध्ये गणरायाच्या सजावटीची तयारी करण्यात आली.
यावर्षी चिपळूणला महापुराचा तडाखा बसल्याने या भागातून येणाऱ्या गणपती मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
गतवर्षाच्या तुलनेत हे दर १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे नागारिकांचा कल वाढला आहे. शाडू मातीपासून तयार केले गेलेल्या मूर्तींनादेखील मोठी मागणी असल्याचे दिसून आले. मंडळांनीदेखील गुरुवारीच मूर्ती खरेदीला प्राधान्य दिले. कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध असल्याने गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही मंडळांनी लहान मूर्ती घेण्याकडेच रुची दाखवली आहे.