जळगाव : िजल्ह्यातील आठ डेअरींमधून घेतलेल्या दुधाच्या व स्किम्ड् मिल्क पावडरच्या ९ नमुन्यांबाबतचा गाझियाबाद येथील केंद्र शासनाच्या रेफरल फूड लॅबचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार एकूण नऊ नमुन्यांपैकी सहा नमुन्यांमध्ये भेसळ(अप्रमाणित) तर तीन नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. एकही नमुना असुरक्षित असल्याचे आढळून आलेले नाही. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या म्हशीच्या दुधाचा नमुनाही अप्रमाणित असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.नऊ पैकी कोणत्या डेअरींचे सहा नमुने अप्रमाणित आढळून आले, याबाबतची विचारणा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बी.यु. पाटील यांना केली असता, मी बाहेरगावी आहे, नावे सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील दक्षता पथकाने १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १६ डेअरींवर धाडी टाकल्या होत्या. यामध्ये ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपये किमतीची ३ हजार ७५७ किलो स्कीम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली होती. धाडीमध्ये पथकांनी गायीचे-म्हशीचे दूध, प्रमाणित दूध,मिक्स मिल्क, स्कीम्ड मिल्क पावडर, टोन मिल्क आदींचे २६ नमुने घेतले होते.हे नमुने मुंबईच्या अन्न विश्लेषक,अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्हा सहकारी दूध संघासह शीतल डेअरी (पारोळा), ममता डेअरी (चाळीसगाव),मंगलमूर्ती डेअरी (चाळीसगाव), सुशील डेअरी (भडगाव), अपेक्षा डेअरी (चाळीसगाव), गणेश दर्शन डेअरी गणेश (चाळीसगाव) आणि सर्मथ डेअरी, भडगाव या आठ डेअरींच्या दुधामध्ये साखर, मिल्क पॅट, स्किम्ड मिल्क पावडर आढळून आली होती. हे दूध अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार असुरक्षित असल्याचे मत अन्न विश्लेषकांनी व्यक्त केले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने या सर्व डेअरींविरुध्द त्यांच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
----------
मुंबईच्या अन्न विश्लेषक,अन्न चाचणी प्रयोगशाळेचा अहवालात नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल आल्यानंतर डेअरीचालकांनी पुनर्तपासणी करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले होते. अन्न व औषध प्रशासनाने या डेअरींचे ९ नमुने गाजियाबादच्या रेफरल लॅबला पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. नऊपैकी एकही नमुना असुरक्षित आढळून आलेला नाही. जर असुरक्षित आला असता तर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असता.