सोमवारी व मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात परिसरातील जवळपास १ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी, मका आडवी झाली तर काही क्षेत्रात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पहूर पेठ, पहूर कसबे, सांगवी, देवळी, गोगडी, खर्चाणा, लोंढ्री, शेरी शिवाराचा यात समावेश आहे.
भाजीपाला उत्पादक संकटात
कसबे गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी पावसाने अडचणीत सापडले आहेत.
यात खर्चाणा शिवारातील अर्जुन मोतीलाल घोंगडे हे अल्पभूधारक शेतकरी असून, यांच्या शेतात नाल्यांचे पाणी घुसल्याने शेताच्या मध्यभागातून पाणी प्रवाहित झाले. जवळपास दोन ते तीन एकरातील कपाशी, कारले, मिरची व कांद्याचे रोप भुईसपाट होऊन शेतातील माती वाहून गेली आहे. याचबरोबर ईश्वर अशोक पवार कपाशी, भगवान मोतीलाल घोंगडे मिरची, पुंडलिक दौलत भडांगे कपाशी, प्रवीण भागवत पवार कारले, दत्तू प्रल्हाद पवार, गजानन भडांगे कपाशी, उत्तम पवार कपाशी, मोतीलाल नथ्यू भडांगे, माधव धनगर, सुधाकर पुंडलिक राऊत, अमृत सुकदेव द्राक्षे, विजय भागवत पवार, लीलाबाई शंकर द्राक्षे, दत्तू सुकदेव द्राक्षे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पेठ व कसबेत घरांची पडझड
पेठमधील शांताराम गोधनखेडे, रामदास गोधनखेडे यांच्या घरांची पडझड झाली तर कसबे अंतर्गत सांगवी रस्त्याला लागून असलेल्या सुमनबाई तडवी, कमलेश तडवी, मनीषा राजू पाटील, सादिक तडवी, शानूर तडवी, इसाक तडवी, शकील तडवी, मस्तान तडवी यांच्या घरात पाणी शिरले आहे.
शेरी शिवारात कपाशी व मका आडवी
भगवान नामदेव शिंदे, बाबुराव विठ्ठल पाटील, शांताराम त्र्यंबक पाटील, प्रभाकर ज्ञानेश्वर पाटील, पंढरी श्रीपत पाटील, नथ्यू श्रावण पाटील, वच्छाला कोळी, संजय चिंधू पाटील, पंढरी वामन मोरे, नारायण लक्ष्मण पाटील, रायदास आस्कर, भगवान मोराडे, किरण मोराडे, कांतीलाल रघुनाथ पाटील, रघुनाथ पुंडलिक, कडुबा केशव पाटील या शेतकऱ्यांसह शेरी शिवारात मोठ्या प्रमाणावर मका व कपाशी आडवी झाली असून, लोंढ्री बु. व लोंढ्री खु. शिवारातील क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रतिक्रिया
मी अल्पभूधारक शेतकरी असून, विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. स्वतः भाजीपाल्याची हात विक्री करून घराचा प्रपंच भागवितो. मंगळवारी झालेल्या पावसाने नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने भाजीपाला जमीनदोस्त होऊन काहीच शिल्लक राहिलेले नाही. मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
-अर्जुन मोतीलाल घोंगडे,
नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक,
शेतकरी, पहूर कसबे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे मंगळवारपासून सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यात येतील. नुकसान भरपाईबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल.
-सुनील राठोड,
तलाठी, पहूर
080921\08jal_2_08092021_12.jpg
खर्चाणा शिवारातील शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.