या घटनेची मेहुणबारे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंचगव्हाण येथील जयवंत भगवान निकम हे पत्नी व मुलांसह राहतात. २०१८ मध्ये त्यांना आर्थिक अडचण आल्याने त्यांनी भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. या व्यवहारात निकम यांची शेतजमीन चौधरी यांच्या नावे करून दिली होती. दरमहा १० हजार रुपये व्याजाने तीन वर्षांत ही रक्कम जयवंत निकम यांनी भाऊसाहेब चौधरी यांना द्यावयाची असे ठरले होते.
या व्याजाची रक्कम परत केल्यानंतर ही जमीन पुन्हा निकम यांच्या नावावर करून देण्याचे ठरले. २०१८ मध्ये दिलेले दोन लाख रुपयांचे कर्ज व त्यावरील दरमहा १० हजार रुपये प्रमाणे तीस महिन्यांचे व्याज अशी एकूण पाच लाख दोन हजार रुपयांची रक्कम परत देऊन ठरल्याप्रमाणे देवाण-घेवाणीचा सौदा पूर्ण झाला असतानादेखील जास्तीची सावकारी व्याजाची पैशाची मागणी करून मानसिक त्रास दिला. तसेच पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार जयवंत निकम यांनी दिली आहे.
मेहुणबारे पोलीस ठाण्यात भाऊसाहेब चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.