पाचोरा : विहिरीत आत्महत्या करीत असलेल्या आईला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळाली.
प्रतिभा पंढरीनाथ पाटील (४५) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे तर नितीन पंढरीनाथ पाटील (२४) असे मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या घरगुती वादातून प्रतिभा पाटील ही महिला गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडली आणि त्यांनी नगराज जालम पाटील यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेतली.
नितीन याच्या चुलत भावाने आई शेताकडे गेल्याचे सांगितले. ही माहिती कळताच नितीन हा शेताकडे पळत सुटला आणि कोणताही विचार न करता आईला वाचविण्यासाठी त्याने थेट विहिरीत उडी घेतली. या विहिरीत १५ फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने नितीन बुडला. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. काही वेळाने प्रतिभा यांचा मृतदेह वर आला तर नितीन हा खालीच कपारीत फसलेला होता. पोहणाऱ्या तरुणांनी तब्बल तीन तास प्रयत्न केल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला. आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने परिसर सुन्न झाला आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी महिलेचा मोठा मुलगा संदीप पंढरीनाथ पाटील यानेही याच विहिरीत आत्महत्या केली होती. त्यावेळी देखील नितीन याने त्यास वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली होती. त्यावेळी पाणी कमी असल्याने आणि पाईपला पकडल्याने नितीन वाचला होता. आता याच विहिरीत त्याचाही मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. नितीन याचे मागील वर्षी लग्न झाले होते आई, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. यानंतर मायलेकावर एकाच वेळी अंतुर्ली खुर्द गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.