संजय पाटील
अमळनेर तालुक्यात मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख ६४ हजार झाडे लावण्यात आली आहेत. पुढील आठ दिवसांत आणखी ३६ हजार झाडे लावण्यात येणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या सर्व कामांसाठी प्रतिझाड १५०० रुपये याप्रमाणे एकूण तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
बिहार पॅटर्नच्या माध्यमातून वृक्षारोपण कामाचे अकुशल :कुशल प्रमाण ८९:११ असल्याने या कामांच्या माध्यमातून जवळपास २७ कोटी रुपयांचा अकुशल निधी निर्माण झाला आहे. या कामांच्या अकुशल निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात १८ कोटी रूपयांचा कुशल निधी प्राप्त होणार आहे. यापैकी ३ कोटी रुपयांचा निधी हा झाडांसाठी वापरला जाणार असून उर्वरित १५ कोटी कुशल निधीच्या माध्यमातून वैयक्तिक व सामुदायिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात करता येतील. मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून चार हजार कुटुंबांना तीन वर्षे रोजगार उपलब्ध झाला आहे.
मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. ग्रामपंचायत गावठाण, शासकीय जागा, गायरान जमिनी यावरील खाजगी अतिक्रमण निष्काषित होत आहेत. शासकीय जागेवरील गौण खनिजांचे अवैध उत्खनन बंद झाले आहे. मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून कुशल निधी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या खात्यात वर्ग होणार आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींची करवसुलीसुद्धा होणार आहे. त्यामधून ग्रामपंचायतींची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणार आहे. मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून बांबू, सीताफळ, आवळा, साग, मोह यांसारखी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे. २०२१-२२ यावर्षी ग्रामपंचायतींना झाडांचे कोणतेही उद्दिष्ट नव्हते, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपे मागणीअभावी पडून होती. त्यामुळे या रोपांचे काय करावे, हा मोठा प्रश्न वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्यासमोर होता.
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्यामुळे ही रोपे उचलण्यात आली. त्यामुळे भविष्यात आणखी रोपे तयार करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग (प्रादेशिक) यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
अमळनेर तालुक्यात भविष्यात शेताच्या बांधावर व खाजगी जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे. अमळनेर तालुक्यातील मैत्री पॅटर्नच्या माध्यमातून झाडांवर आधारित नवीन अर्थव्यवस्था उभी राहत असून ती महाराष्ट्र राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
विप्रोत कामगारांना रोजगार मिळणार
शहरातील प्रताप मिल बंद पडली. विप्रो, आरके पटेल, जर्दा कारखान्यांचे कामगार कमी झाले, त्यामुळे बेरोजगारी वाढली होती. मात्र, आता कोरोनानंतर विप्रो कंपनीने हिमाचल प्रदेशातील आपले युनिट अमळनेरात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांची संख्या वाढून बेरोजगारी काही प्रमाणात कमी होऊन शहराच्या औद्योगिक, व्यापार क्षेत्रात वाढ होऊन आर्थिक स्तर उंचावणार आहे.
यासह शासनानेदेखील आता कामांना सुरुवात केल्याने रस्ते, सभागृह, व्यायामशाळा, बंधारे, मोऱ्या, पेव्हरब्लॉक, संरक्षण भिंती, शाळा खोल्या, डांबरीकरण, काँक्रिटीकरण आदी कामे सुरू झाल्याने बंद असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली आहे. त्यातून बांधकाम व्यावसायिक, मजूरवर्ग, ठेकेदार हे आर्थिक संकटातून मुक्त होऊ लागले आहेत. त्यासोबत शहर व ग्रामीण भागातील सुशोभीकरण वाढून तालुक्याचा कायापालट होणार आहे.