मारवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून लोण येथील उदय निंबाजी पाटील यांच्या २ बैलजोडी, निम येथील रोहिदास कोळी यांची बैलजोडी त्याचप्रमाणे धार येथील शेतकऱ्यांची बैलजोडी आदी भागांतून आठ गुरे चोरीस गेली होती. फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती. लोण येथील शेतकरी उदय पाटील यांनी चोरी करणारे वाहन व त्यांचे सहकारी यांना नियोजनबद्ध पकडून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
त्यांचा मुख्य सूत्रधार अमजद कुरेशी हा जळगावचा असल्याची माहिती उघड झाली होती. त्याचा मोबाइल क्रमांक, त्याचा पत्ता उदय पाटील यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिला होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून पोलीस तपास चालू आहे. आरोपीचा मोबाइल लगेच बंद झाला, आदी कारणे सांगून टाळाटाळ करीत होते. यासंदर्भात उदय पाटील यांनी वेळोवेळी केलेले संभाषण जतन करून ठेवले होते. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच एलसीबी पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
मारवड पोलिसात गुरे चोरीचे तीन गुन्हे दाखल असून त्याला लोण येथील चोरीप्रकरणी अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साळुंखे, हेडकॉन्स्टेबल विशाल चव्हाण यांनी आरोपी अमजद कुरेशी यास पारोळा न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील प्रतिभा मगर पाटील यांनी युक्तिवाद केला. न्या. पी.जी. महाळणकर यांनी आरोपीला १२ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.