चाळीसगाव : ‘३० ऑगस्टच्या मध्यरात्री पाटणादेवीच्या डोंगररांगांमधील गोमुखातून उगम पावणाऱ्या डोंगरी नदीने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले होते. एवढा मोठा पूर तिला पहिल्यांदाच आला. डोळ्यांसमोर आमच्यातील १६ कुटुंबांची घरे आणि संसारही पुरात वाहून गेले. आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत...’ आपला हुंदका रोखत देवीदास किसन माळी हा ऊसतोड मजूर पुराची आपबिती सांगत होता. याच परिसरात चाळीत साठविलेला कांदा पुराने बाधित झाला असून, अतिवृष्टीमुळे नवीन लागवड केलेल्या रोपांनादेखील बुरशी लागत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
चाळीसगाव शहरापासून नैऋत्येला १६ किमी अंतरावर पाटणादेवीच्या जवळ असणाऱ्या पिंपरखेड गावातही ३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व ३१ रोजी पहाटे आलेल्या पुराने पिकांना मोठा फटका बसला आहे. गाव यात्रा भरणाऱ्या जागेत वर्षभरापूर्वी झोपड्या करून राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ३६ पैकी १६ घरे संसारोपयोगी साहित्यासह पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. काही क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने हे मजूर या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत. शून्य नजरेने आपल्या उजाड झालेल्या आयुष्याकडे आणि घराच्या जागेकडे पाहत बसलेले असतात.
चौकट
डोळ्यादेखत वाहिली १६ घरे
अशोक छगन मोरे,
दिलीप छगन ,
विलास हिरामण बरडे, रोहिदास महादू सोनवणे, मच्छींद्र रमेश माळी, सीताराम सुकदेवा माळी, प्रभू विठ्ठल पवार, सुरेश रामदास माळी, अशोक संजय मोरे, संजय छगन मोरे, तुकाराम वाल्मीक ठाकरे, भाईदिस किसन माळी,
भोलेनाथ नामदेवा माळी, पिंटू सुकदेव माळी, देवीदास किसन माळी, हरिदास किसन माळी या १६ ऊसतोड मजुरांची घरे पुरात वाहून गेल्याने त्यांच्याकडे अंगावरचे कपडे तेवढे उरले आहेत.
चौकट
चाळीत साठविलेला कांदा पाण्यात
पिंपरखेड शिवारात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली जाते. शेतकरी उन्हाळी कांदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विकण्यासाठी चाळीत साठवून ठेवतात. पुराचे पाणी कांदा चाळींमध्ये शिरल्याने शेकडो टन कांदा बाधित झाला असून, काही वाहून गेला. कांदा चाळींचेही नुकसान झाले आहे. काही पोल्ट्रीफार्मचीही पुराने नासधूस झाली आहे.
१...यंदा आठ ते नऊ हजार रुपये पायलीने कांदा रोपे विकत घेऊन ती शेतकऱ्यांनी लावली; मात्र अतिवृष्टीने नवीन लागवड केलेल्या रोपांना बुरशी लागत असल्याने शेतकरी हबकले आहेत.
चौकट
कोरडवाहू पिके वाहिली
पाटणादेवी, पिंपरखेड, चंडिकावाडी परिसरात बागायतीसह कोरडवाहू कपाशीचा पेरा मोठ्या क्षेत्रावर होतो. याबरोबरच मका, ज्वारी, बाजरी ही पिकेही घेतली जातात. पुराच्या पाण्यातही पिके मातीसह वाहून गेली आहेत. शेकडो एकरवरील हे नुकसान असून, फळबागांनाही फटका बसला आहे.
१...शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना पुन्हा शेती तयार करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. हा खर्च एकरी एक लाखापर्यंत होऊ शकतो. दोन वर्षापासून कोरोना आणि आता पूर आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
शेतातील माती वाहिल्याने अगोदरच पुराच्या नुकसानाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा शेती तयार करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. हा आर्थिक भार मोठा आहे. याच्यासाठी आता मदत झाली पाहिजे.
-राजेंद्र वाडीलाल राठोड,
माजी जि. प. सदस्य, पिंपरखेड ता. चाळीसगाव.
इन्फो
किराणा सामान, अन्नपदार्थ आम्हाला मिळत आहे. संस्था, नागरिकांचे मदतीचे हातही पोहोचत आहे. गत आठ दिवसांत माणुसकीचे दर्शन यातून झाले; मात्र मायबाप सरकारने ठोस मदत केली पाहिजे. पंचनामे झाले आहे. तातडीने भरपाई मिळावी.
-देवीदास किसन माळी,
पूरग्रस्त, पिंपरखेड ता. चाळीसगाव.
070921\07jal_6_07092021_12.jpg~070921\07jal_7_07092021_12.jpg
पिंपरखेडे येथे डोंगरी नदीकाठी असणाऱ्या १६ ऊसतोड मजुरांची घरे व संसार पुरात वाहून गेला. ~पिंपरखेडे येथे डोंगरी नदीकाठी असणाऱ्या १६ ऊसतोड मजुरांची घरे व संसार पुरात वाहून गेला.