भुसावळ: शहरातील शांतीनगर प्राथमिक शिक्षक कॉलनी येथील एका व्यक्तीकडे दोन मीटर असून रोज संध्याकाळी ७ वाजेपासून गच्चीवर जाऊन सकाळपर्यंत विजेची चोरी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सदर वीज वितरण कंपनीने छापा मारत अनधिकृतपणे तारांवर टाकलेले आकोडे जप्त करण्यात केले असून या इसमास १४ हजारांचा दंड देण्यात आला आहे.
या व्यक्तीच्या घरात दोन मीटर असून त्याची सेटिंग करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या वीज चोरीमुळे या परिसरातील रहिवाशांना न वापरलेल्या विजेचे वीज बिल जास्त प्रमाणात येत होते. मात्र वीज बिल चोरी करणारे महाशय आपले कोणीही काहीही करू शकत नाही असे म्हणून वावरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे यांना समजल्यानंतर घोरुडे यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, सहाय्यक अभियंता आर. जी. पद्ममे यांनी सदर इसमाच्या घरी सुरू असलेली वीज चोरी रंगेहात पकडली.
५४७ युनिटची झाली वीज चोरी..
विद्युत वितरण कंपनीने त्या इसमाच्या घरातला वीज वापर व आलेले बिल यातील तफावत यात कॅल्क्युलेट केले असता ५४७ युनिटची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले, यात १० हजारांची वीज चोरी तसेच गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ४ हजारांचा दंड असा एकूण १४ हजारांचा दंड सदर व्यक्तीस देण्यात आलेला आहे.
‘लोकमत’कडे करण्यात आली होती तक्रार
शांतीनगर येथील वीज चोरी प्रकरणी ‘लोकमत’कडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली.