भोकरदन (जि.जालना) : विद्युत वायरला चिटकलेल्या पतीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी नांजा (ता.भोकरदन जि.जालना) शिवारात घडली.
सुनिता बाबासाहेब वळेकर (५०) असे मयत महिलेचे नाव आहे तर बाबासाहेब वळेकर (५६) हे गंभीर जखमी झाले आहेत. बाबासाहेब वळेकर (रा. तळणी ह.मु.नांजा) हे नांजा गावाजवळील शिरसगाव मंडप शिवारातील शेतात कुटुंबासह राहतात. वळेकर हे शुक्रवारी सकाळी पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी लागते म्हणून घराजवळील विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक ते विद्युत तारेला चिटकले. ही बाब लक्षात येताच त्यांची पत्नी सुनिता यांनी पतीला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्याचवेळी सुनिता वळेकर यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बाबासाहेब वळेकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भोकरदन शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मयत महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फोटो: मयत सुनिता वळेकर