जालना : गत ११ महिन्यात शहर व परिसरातून तब्बल १८६ दुचाकीच्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यातील केवळ ६० दुचाकींचा तपास लागला आहे. उर्वरित दुचाकी सापडलेल्या नसून यातील बहुतांश दुचाकी इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात विक्री केल्या जातात. विशेषत: अनेक ठिकाणी दुचाकींचे सुटे पार्ट करून त्याची विक्री करण्याचा प्रकार चोरटे करीत आहेत.
शहरासह परिसरात गत काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकी चोरी रोखण्यासाठी चांगले लॉक लावण्याकडेही अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. केवळ हॅण्डल लॉकवर दुचाकी नीट राहील हा विश्वास अनेकांना आहे. मात्र, हॅण्डल लॉक चोरटे काही सेकंदात तोडून दुचाकी हातोहात पळवित आहे. त्यामुळे वाहन धारकांनी दुचाकीला साखळीचे लॉक, समोरील चाकाला वेगळे लॉक लावले तर दुचाकी चोरी जाण्याची शक्यता कमी होणार आहे.
स्पेअर पार्ट काढून केली जाते विक्री
चोरीच्या दुचाकींचा चोरटे इतर ठिकाणी चोरी करण्यासाठी वापर करतात. किंवा इतर गुन्हेगारी कृत्यासाठी या दुचाकी वापरल्या जातात. अनेकवेळा अशा दुचाकी बेवारस आढळून येतात. मात्र, चोरीस गेल्यानंतर वर्षानुवर्षे ज्या दुचाकींचा शोध लागत नाही, अशा दुचाकींचे स्पेअर पार्ट काढून चोरटे विक्री करीत असल्याचेही दिसून येते.
३५ चोरटे पकडले
शहरातील कदीम, चंदनझिरा, सदरबाजार व तालुका पोलिसांनी आजवर विविध ठिकाणी कारवाई करून जवळपास ६० दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दुचाकी चोरींचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवाय दाखल गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. काही गुन्हेही उघडकीस आले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहन धारकांनीही आपल्या दुचाकी चोरीस जाऊ नयेत, यासाठी चांगले लॉक लावून त्या सुरक्षित ठिकाणी लावाव्यात.
- सुधीर खिरडकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी