मंठा : तालुक्यातील शेतक-यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाई म्हणून दुसºया टप्प्यात २८ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. असे असले तरी यापूर्वी तालुक्याला मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील केवळ ५० टक्के रकमेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटप करण्यात आलेले आहे.
गतवर्षी तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पावसाने हजेरी लावली होती. या संधीचा फायदा घेत शेतकºयांनी वेळेवर पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बियाणे कंपन्यांनी शेतकºयांना बोगस बियाण्यांचा पुरवठा केल्यामुळे असंख्य शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. असे असतानाच जुलै महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी झाली. यात जमिनी खरडून गेल्या. यावेळी अंभोडा कदम आणि पाटोदा या दोन गावांमधील शेती नुकसानीचे आणि पिकांचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात मूग तोडणीला येताच संततधार पाऊस सुरू राहिला. दरम्यान शेंगातच मुगाला कोंब फुटले. शेतकºयांनी मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी करताच महसूल प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले. याची मुदत मिळण्यापूर्वीच पुन्हा अतिवृष्टी, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाला. यात हाती आलेली सोयाबीन, कापसासह तूर, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पुन्हा नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे केले. यानंतर पहिल्या टप्प्यातील २८ कोटी ७७ लाख रूपयांचे अनुदान नोव्हेंबर महिन्यात तालुक्यासाठी मिळाले. परंतु, हे अनुदान वाटप करण्यासाठी अजून जिल्हा मध्यवर्ती बँकेला दीड महिना लागणार आहे. यातच दुसºया टप्प्यातील प्राप्त झालेले २८ कोटी रूपयांचे अनुदान बँकेकडून कधी वाटप होणार? असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे.
चौकट
पहिल्या टप्प्यातील दुष्काळी अनुदान यापूर्वी बँकांकडून वाटप करण्यात आले आहे. आता दुस-या टप्यातील २८ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले असून, ते लवकरच शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाईल. परंतु, एखाद्या बँकेने विनाकारण शेतक-यांना त्रास देण्यासाठी पैसे जमा करण्यास दिरंगाई केल्यास शेतकºयांनी तहसील प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार सुमन मोरे यांनी केले आहे.
कोट
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भोंगळ कारभार वाढला आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे अद्याप सर्व शेतकºयांना मिळालेले नाही. बँक व्यवस्थापक त्यांच्या मर्जीतील लोकांनाच सध्या पैसे देत आहे. अद्याप ५० टक्के सामान्य शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. आता दुसºया टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असून, याचे वाटप कधी होणार हे सांगणे सध्या कठीण आहे. यापुढे जिल्हा बँक व्यवस्थापणाने बँक कर्मचाºयांच्या शनिवार व रविवारच्या सुट्ट्या रद्द करून अनुदानाचे वाटप करावे.
प्रल्हाद बोराडे, संचालक, कृउबा समिती, मंठा.
शेतकºयांचे पहिल्या टप्यातील दुष्काळी अनुदान वाटप करण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत बँक व्यवस्थापनाने नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप झाल्यानंतर दुस-या टप्यातील अनुदान वाटप केले जाईल. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाकडून बालासाहेब वाघमारे यांनी दिली.