जालना : सभोवतालचे समृद्ध अनुभव पचवतांना, संवेदनशील आंतरमनाने वेदनेला दिलेला प्रतिसाद म्हणजे कविता, असे मत वक्ते व कवी डाॅ.दिगंबर दाते यांनी व्यक्त केले.
जालना येथील मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘निर्मितीच्या शब्दकळा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीक्षक डाॅ.रावसाहेब ढवळे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहडकर, संयोजक कवी कैलास भाले, प्रा.पंढरीनाथ सारके यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयीन जीवनापासून जसा जगलो व जे जे भोगलं, ते ते अनुभवाशी प्रामाणिक राहून कवितेतून मांडत गेलो. कवीने स्वतःशी व आलेल्या अनुभूतीशी ईमान राखत आपल्या कवितेचा पोत समृद्ध केला पाहिजे. आत्मसन्मानाशी तडजोड न करणारी कविताच अमर होत असते, म्हणूनच कविता कधीच उथळ असू नये. आजच्या आधुनिक व्यवस्थेला सामोरे जाताना संवेदनशीलता हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डाॅ.दाते यांनी आपल्या मशाल, क्रांती या कवितेसह अभंग व गझल सादर केली. प्रास्ताविक कवी सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुहास पोतदार यांनी केले. कार्यक्रमास मनीष पाटील, शांतीलाल बनसोडे, लक्ष्मीकांत दाभाडकर, विठ्ठल वरपे, रामा सुपारकर, मिलिंद घोरपडे व इतरांची उपस्थिती होती.
फोटो