भोकरदन : तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हवालदिल झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोना नियमांचा फज्जा
परतूर : शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करीत आहे. परंतु, कोणीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत नाही. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२० कोटी खात्यावर जमा
जालना : पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व १ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात शुक्रवारी दोन हजार रूपयांचा या वर्षाचा शेवटचा हप्ता खात्यात जमा करण्यात आल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष देशमुख यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : कोरोना प्रतिबंधक लसीत डुकराच्या चरबीचा उपयोग टाळावा, अशी मागणी वर्ल्ड ॲनिमल ऑर्गनायझेशनच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनावर नारायण शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बदनापुरात महावितरणचा मनमानी कारभार
बदनापूर : बदनापूर शहरात महावितरणचा मनमानी कारभार सुरू असून, या कारभाराला नागरिक वैतागले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. बदनापूर शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दुरूस्तीसाठी चालढकल केली जात आहे. दुसरीकडे दुरूस्तीच्या नावावर अनेक तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
डॉ. सय्यद यांचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून सत्कार
परतूर : कोरोनाच्या या भयावह परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद झाहेद यांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मानित केले. जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. संतोष कडले यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय विद्यानिकेतन येथे निवड
जालना : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव येथील जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थी विकास रहडे याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. याबरोबरच त्याची औरंगाबाद येथील शासकीय विद्यानिकेतन येथे निवड झाली आहे. या निवडीचे गटशिक्षणाधिकारी शहागडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मगर, केंद्रप्रमुख इंगळे, मुख्याध्यापक रामेश्वर चंदनकर, वर्गशिक्षक अमोल येनकर आदींनी कौतुक केले.
वालसावंगी परिसरात रिक्त पदांमुळे ग्रामस्थ त्रस्त
वालसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, शाळेतील शिक्षक, तसेच वीज कर्मचारी अशी पदे रिक्त आहेत. धावडा येथील वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ रिक्त पदे भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कांद्याच्या रोपांची बाजारात किलोने विक्री
तीर्थपुरी : कुंभार पिंपळगाव येथील आठवडे बाजारात बुधवारी कांद्याच्या रोपांची ५० रूपये किलोने विक्री झाली. परतीच्या पावसाने कांद्याच्या बियाण्यांचे मोठे नुकसान झाले, बियाणे उगवले नाही. दुबार बी आणून पेरावे लागले, काही शेतकऱ्यांना रोप मिळणेही अवघड झाले होते. मात्र, आता आठवडी बाजारात कांद्याची तयार रोपे विक्रीला येऊ लागली आहेत. बुधवारी बाजारात कांद्याच्या रोपांची ५० रूपये किलोने विक्री झाली.
कापूस खरेदी केंद्रावर वाहनांची गर्दी
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे. तसेच वाहनांतून मोठ्या प्रमाणावर या केंद्रावर कापासाची आवक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस घरातच पडून होता. शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार घनसावंगी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या वतीने कुंभार पिंपळगाव, राणी उंचेगाव, तीर्थपुरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहनांसह गर्दी केली होती.
हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी
जालना : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रूग्णालयात हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३० बालकांची तपासणी करण्यात आली. १२ मुलांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.