जालना : जिल्ह्यातील चार जणांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात शनिवारी केवळ १३ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गत महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या समाधानकारकरीत्या घटली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्या उपाययोजनांना जिल्हावासीयांची साथ मिळाल्याने कोरोनाबाधितांची संख्या दिलासादायकरीत्या घटली आहे. आराेग्य विभागाला शनिवारी ५२७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, केवळ चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७६ वर गेला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा समावेश आहे. तर सेवली येथील एक, मंठा तालुक्यातील बोदरा येथील एक व अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या १३ सक्रिय रुग्ण आहेत. काहींवर रुग्णालयात तर काहींवर गृह अलगीकरणात उपचार सुरू आहेत.
संस्थात्मक अलगीकरणात एकही रुग्ण नाही
जिल्ह्यात २५ संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू आहेत. त्यातील अंबड येथील अलगीकरणात गत काही दिवसांपर्यंत रुग्णांवर उपचार केले जात होते. सद्य:स्थितीत मात्र या २५ संस्थात्मक अलगीकरणात एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
११८९ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ७०८ वर गेली असून, त्यातील ११८९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ८१५ जणांचा शासकीय रुग्णालयात तर ३७४ जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ५०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
३९६७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात आजवर ६ लाख २३ हजार ८९१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. दैनंदिन अहवालात ५२७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर अद्याप ३९६७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे.