जालना : कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातही पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. काही मुलांनी शाळेतून मिळालेल्या जुन्या पुस्तकांवर ज्ञानार्जन सुरू केले आहे.
कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मुलांना दिले जात आहे. दुसरीकडे शासनाने कोरोनामुक्त गावांमधील शाळा सुरू करण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सर्वशिक्षा अभियानांतर्गत मुलांना शासनाकडून देण्यात येणारी नवीन पाठ्यपुस्तके अद्यापही मिळालेली नाही. प्रतिवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून पुस्तकांचे वाटप सुरू केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. शाळांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. या पुस्तकांवरच काही मुलांनी अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु, जिल्ह्यातील असंख्य मुलं आजही नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांपासून वंचित आहेत. जिल्ह्याला जवळपास १३ लाखांहून अधिक पुस्तकं लागणार आहेत. त्याची मागणीही शिक्षण विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.
४० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे.
शासनाकडून पुस्तके मिळण्यास उशीर होणार असल्याने मुलांनी शाळेत जुनी पुस्तके जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार जवळपास ४० टक्के मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. नव्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांना ही पुस्तके वाटप करण्यात आली आहेत.
पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार?
आम्हाला शिक्षकांकडून ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, पुस्तकं नसल्याने अभ्यास करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्हाला अभ्यासासाठी नवीन पुस्तके शासनाने द्यावीत.
- आयान शेख
ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. शिक्षकांकडून शिकविण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु, नवीन पुस्तकं मिळालेली नाहीत. पुस्तकांसाठी शिक्षकांकडे विचारणा करीत आहोत.
- आदित्य रोडी
शासनाकडे मागणी केली आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मुलांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची नोंदणी शासनाकडे केली आहे. पुस्तके प्राप्त होताच गरजूंना वाटप केली जातील. - कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी