कोरोनात अनेकांच्या हातचे गेलेले काम आणि व्यवसायावर झालेला परिणाम यामुळे बहुतांश नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे. त्यात पेट्रोल, गॅस, खाद्य तेलांचे दर वाढत आहेत. विशेषत: शासनाने ग्राहकांकडून गॅसची पूर्ण रक्कम घेताना सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. ही सबसिडी आता केवळ नावाला उरली आहे. तर दुसरीकडे दिवसागणिक गॅसची दरवाढ होत आहे. त्यामुळे गॅसचा वापर करताना महिलांची धाकधूक वाढत आहे.
छोट्या सिलिंडरचे दर ‘जैसे थे’
जालना शहरासह जिल्ह्यात लहान गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांची संख्या ही खूपच कमी आहे.
या सिलिंडरचे दर गत काही दिवसांपासून जैसे थे कायम आहेत.
परंतु, घरगुती, व्यावसायिक सिलिंडरचे दर सतत वाढताना दिसत आहेत.
गॅसच्या दरवाढीचा परिणाम जिल्हाभरातील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांनाही सहन करावा लागत आहे.
सबसिडी बंद,
दरवाढ सुरूच
शासनाने प्रारंभी गॅसवर सबसिडी देण्यास सुरुवात केली होती.
प्रारंभीच्या काळात चांगली सबसिडी मिळत होती.
नंतर मात्र या सबसिडीत घट झाली. ज्यांना मिळते ती ही खूपच कमी प्रमाणात आहे. सबसिडी मिळत नसताना गॅसचे दर मात्र दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.
व्यावसायिक सिलिंडर दरामध्येही वाढ
मागील महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर १५९४ होते.
सद्यस्थितीत याच १९ किलोच्या सिलिंडरचे दर १६६६ रूपये आहेत.
शहरात चुली कशा पेटवायच्या?
गॅसदर हे आम्हा गृहिणींचे मासिक आर्थिक गणित बिघडवणारे ठरत आहेत. गॅस दरात अशीच वाढ होत राहिली तर चूल पेटवावी लागणार आहे. परंतु, शहरात चूल पेटविणार कशी असाही प्रश्न आहे.- उषा इंगळे
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे. त्यात गॅसचे दरही सतत वाढत आहेत. त्यामुळे गॅसचा वापर करताना तो वेळेपूर्वी संपू नये, याची धास्ती असते. - संगीता वाघमारे