बदनापूर : गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केलेले योग्य नियोजन आणि ग्रामस्थांची मिळालेली साथ यामुळे अंबडगाव (ता. बदनापूर) कोरोनामुक्त झाले आहे. विशेषत: यापुढेही कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
१४२० लोकसंख्येच्या या गावामध्ये २१० घरे आहेत. गावात आजवर केवळ सहा जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील एकाचा मृत्यूही झालेला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रशासकीय सूचनांचे पालन केले आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा अधिक काळ प्रभाव दिसून आला नाही. ग्रामपंचायतीनेही विविध उपाययोजना राबवून जनजागृती केली. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या उपक्रमांना प्रतिसाद देत सूचनांचे पालन केले. त्यामुळे अंबडगाव हे आज कोरोनामुक्त झाले असून, कोरोनामुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये तालुक्यात अव्वल ठरले आहे. शिवाय सद्य:स्थितीत कोरोनाबाबत दक्षता घेतली जात आहे.
लसीकरणासाठी समिती
n कोरोनाच्या लढ्यात लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी समिती गठित केली आहे.
n आजवर गावातील ६२२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विविध उपाययोजनांमुळे गाव तालुक्यात अव्वल ठरले आहे.
ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावबंदी करण्यात आली. प्रत्येक आठवड्याला गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
पाणीसाठे कोरडे करून कोरडा दिवस पाळण्यात आला. गावात अलगीकरण कक्षाची स्थापना, नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. लसीकरण वेळेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- राजेश जऱ्हाड, उपसरपंच
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे, ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गाव स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. ग्रामस्थांनीही प्रशासकीय सूचनांचे पालन वेळोवेळी केले आहे. त्यामुळे आज गाव कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत मिळाली.
-पी.जी. पंजाबी, ग्रामसेवक
गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. वेळोवेळी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. शिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत व्हावे, यासाठीही आरोग्य केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. अश्विनी मेतेवाड