जालना : अंबड येथे उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांची तब्येत बिघडल्याने त्यांना जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी पालकमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात येतील, असे राज्य सरकारने जाहीर केले होते; परंतु आजपर्यंत या कुटुंबीयांना सरकारकडून नोकरी किंवा आर्थिक मदत मिळाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनाेज जरांगे यांच्यासह शहिदांच्या कुटुंबातील सदस्यांनी सोमवारपासून अंबड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पडत्या पावसातही हे उपोषण सुरूच होते. दरम्यान, मनोज जरांगे, बाळकृष्ण लेवडे, हरीओम येवले, सुनील शेळके, माणिक जगताप, संतोष गुजर आदी उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अंबड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मनोज जरांगे व बाळकृष्ण लेवडे यांना जालना येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. परंतु, जरांगे व लेवडे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास नकार दिला होता. दरम्यान, शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी टोपे म्हणाले, क्रांती मोर्चा आंदोलनाच्या वेळेस ४२ आंदोलकांनी बलिदान दिले. या बलिदान देणाऱ्या आंदोलकांसाठी तत्कालीन शासनाने काही रक्कम व त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्या आश्वासनाबद्दल कटिबद्ध आहोत. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मजा सराफ, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, सपोनि. निरीक्षक महेश टाक, नगरसेवक ढोबळे, मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक परळी अमित घाडगे, शिवराय जोगदंड, हनुमंत पाटील, योगेश गांगर्डे, परमेश्वर काळे, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.