जालना : अन्यायी समाजव्यवस्था संपविण्यासाठी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी औषध असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. के.जी. सोनकांबळे यांनी केले.
येथील जेईएस महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या नामविस्तार दिनानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूल्यगर्भ शैक्षणिक विचार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.बी. बजाज होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. संध्या रोटकर, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. यशवंत सोनुने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सोनकांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार समाजक्रांतीपासून सुरु होतो. शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा. या तत्वत्रयीने अन्यायी समाजव्यवस्था नष्ट करणे हे त्याचे ध्येय होते. शिक्षणातून चारित्र्य, नीतिमत्ता निर्माण व्हावी. माणसाला माणूस म्हणून उभे करण्याचे साधन शिक्षण आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे हत्यार आहे आणि याच उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्थांच्या माध्यामातून दलित, वंचित, आदिवासी, बहुजन समाजासाठी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचाराचे चिंतन करताना ते म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध यांनी शिक्षणाचे महत्व ‘अत्त दीप भव’ तू प्रकाशमान हो ! तर संत कबीर यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर शिक्षणाला जीवनात मूलगामी स्थान देणारे आणि शिक्षणाला समाज परिवर्तनाचे औषध मानणारे महात्मा फुले यांच्या विचारांचा परिणाम प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता. शिक्षण हा त्यांच्या आयुष्याचा ध्येयवाद, त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन झाले होते. विद्या हि त्यांच्या आयुष्याची साधना झाली होती. असेही ते या वेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत सोनुने यांनी केले तर डॉ महावीर सदावर्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आंबेडकरांनी समाजाला चिरंतन विचार दिला- बजाज
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बजाज म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला चिरंतन विचार दिला. ज्ञानसंपन्न समाज निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार हे मोलाचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. पी.सी.बाफना आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.