आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या लाइनवरील आर्थिंगची तार रविवारी सकाळी तार अचानक तुटून पडली. या तारेचा विद्युत धक्का लागल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेने आव्हाना गावात एकच खळबळ उडाली आहे.
आव्हाना गावासह परिसरात वीज वितरणच्या एक ना अनेक समस्या आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागतो. इतर निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्याही अधिक आहेत. त्यात आव्हाना गावांतर्गत दहिगाव मार्गावरील एक आर्थिंगची विद्युत तार रविवारी सकाळी अचानक तुटून खाली पडली. या तारेचा विद्युत धक्का लागल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. ही बाब गावातील रामचंद्र ठाले यांना समजली. त्यांनी तुटलेल्या तारेमुळे उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेता ती तुटलेली तार रस्त्याच्या बाजूला केली. तार तुटल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गावरून शेतशिवारात जाणाऱ्या- येणाऱ्या शेतकऱ्यांची, जनावरांची संख्या मोठी आहे. ही तार वेळेत रस्त्याच्या बाजूला झाली नसती तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान, आव्हाना परिसरातील विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
चौकट
आकड्यांची संख्या वाढली
आव्हाना गावात विजेच्या तारेवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आकड्यांमुळे राेहित्रावर लोड येऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. याकडेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावातील महावितरणच्या खांबावर पडणाऱ्या आकड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वीज ग्राहक करीत आहेत.
फोटो