मंठा तालुका ग्रामीण भागात विखुरलेला आहे. या ठिकाणी उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे मजूर आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे रोजगारासाठी गेलेले आहेत. तर काही साखर कारखान्याच्या कामांसाठी ऊसतोड कामगार महाराष्ट्रासह इतर राज्यांत गेलेले आहेत. परगावांमधील मतदारांचा शोध घेण्याचे काम सध्या उमेदवारांनी सुरू केले आहे. सध्या शेतात तूर काढणीची कामे आणि रबीच्या पिकांची आंतरमशागतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर गावात शुकशुकाट दिसत आहे. सकाळ- संध्याकाळ उमेदवार मतदारांच्या घरी भेटी देत आहेत. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रचारात काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु, गावातील सर्वच उमेदवार एकमेकांचे जवळीक आहेत. तर काही ठिकाणी भावकीतील उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने मतदान कोणाला करावे? हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी १५६ प्रभागांत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेतून एकूण ४१८ उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यातील ५० ग्रामपंचायतींमधून २८ उमेदवार बिनविरोध निवडलेले आहेत. तर ९०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यात ४७६ महिला तर ४२५ पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यातून एकूण ३९० सदस्य निवडले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने १० क्षेत्रीय अधिकारी, १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह एकूण ८५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी सांगितले.
काँग्रेसला चांगले दिवस
तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात काँग्रेसचे आ. राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे, तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळसह काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.