भोकरदन : भोकरदन परिसरातील शेतकऱ्यांच्या मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान थांबविण्यासाठी मिरचीवर बुरशीनाशकाची आळवणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले आहे.
भोकरदन, पेरजापूर, तळेकरवाडी शिवारातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील बहरलेल्या मिरची पिकाला बुरशी लागून उबळ लागली व पूर्ण पीक आठ दिवसांत वाळले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी मिरचीचे पीक उपटून टाकत आहेत. मात्र, ज्या पिकाला उबळची नेमकी लागण झाली आहे, अशा पिकाला बुरशीनाशकांची आळवणी केली तर पीक सुधारते आहे, असे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी स्वाती कांगणे, मंडळ कृषी अधिकारी पाटील, कृषी साहाय्यक कल्पना आरक यांनी शेतात जाऊन संबंधित शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी बारकुबा तळेकर, कृष्णा हिवरकर, कैलास सुसर, आप्पाराव देशमुख, राजू तळेकर, संतोष जाधव, समाधान तळेकर, संतोष तळेकर हे शेतकरी उपस्थित होते.