जालना : जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक ६२३.१० मिमी म्हणजे तब्बल १०३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४१.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर तब्बल २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाचे आगमन झाले आहे; परंतु, मध्यंतरी पावसाने जिल्हाभरात मोठा खंड दिला होता. त्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात दोन प्रकल्पांत २५ टक्क्यांच्यामध्ये, चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये, सात प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांच्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे तर १३ प्रकल्पांची पाणीपातळी ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये आहे. लघु प्रकल्पांची स्थिती पाहता २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. २२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांच्या मध्ये, १० प्रकल्पांमध्ये २६ ते ९० टक्क्यांच्या मध्ये तर सात प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. १४ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांच्या वर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती
जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. कल्याण मध्यम प्रकल्पात ४६.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४.३० टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात १.९९ टक्के, धामना प्रकलपात ३०.७९ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ८.१६ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ४३.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
१५ पैकी तीन बंधाऱ्यांत पाणी
जिल्ह्यात १५ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील बंधारा तुडूंब भरला आहे. तर करडगाव, दहेगाव येथील बंधाऱ्यांमध्ये पाण्याची आवक झाली आहे. उर्वरित कोल्हापुरी बंधारेही पावसाअभावी कमी पाणी पातळीत आहेत.
पिकांना दिलासा, काही ठिकाणी नुकसान
पंधरा ते वीस दिवसांनंतर सलग पाच ते सहा दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकून जाणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, याच कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.