आखाडा बाळापूर : माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचास कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पेठवडगाव येथे घडली. या प्रकरणी मंगळवारी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत तातेराव लक्ष्मण जनकवाडे (रा. नांदुसा, ता.जि. नांदेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यावरून आरोपी राजकुमार माधवराव बाल्टे, गोदावरी माधवराव बाल्टे, माधवराव बाल्टे, जनार्दन माधवराव बाल्टे, ज्ञानेश्वर माधवराव बाल्टे, ललिता दिगंबर बाल्टे, काशीबाई, काशिबाईचा नवरा (सर्व रा. पेठवडगाव) यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ते १३ ऑक्टोबरच्या दरम्यान आशाबाई राजकुमार बाल्टे (वय ३२, रा. पेठवडगाव) हिने स्वत:च्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पती राजकुमार बाल्टे यांच्या टेलरिंग व्यवसायासाठी माहेराहून ३ लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी आशाबाईचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच मारहाण करून शिवीगाळ केली. जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोनि पंडित कच्छवे करीत आहेत. (प्रतिनिधी)