केशोरी येथे : ३४ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३४ गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न लक्षात घेता येथे ग्रामीण रूग्णालयाची नितांत गरज आहे. मात्र त्याबाबतची मंजुरी सद्यस्थितीत हवेतच आहे.शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना रितसर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आणि रुग्णांची संख्या, गरोदर माता, प्रसूती होणाऱ्या मातावर योग्य उपचार, अपघातातील गंभीर जखमींवर योग्य उपचार व पुरेशा सोईसुविधा मिळण्यासाठी काही कालावधीपूर्वी केशोरी येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीची चर्चा जोरदार सुरू होती. परंतु मंजुरीचे आदेश हवेतच असल्याचे दिसून येत आहे. अजूनही ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.सदर परिसर विस्ताराने फार मोठे असून जंगलव्याप्त आहे. या परिसरातील खेड्यात अजूनही दळणवळणाची साधने नाहीत. अशावेळी अपघातातील गंभीर जखमी, रुग्ण, गरोदर माता, प्रसूती मातांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा वाटेतच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णांना पाहिजे तेवढ्या सुविधा शासन प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे पुरवू शकत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. शासनाच्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत घरपोच गाडी व बाळंतपणाचे सोपस्कार पार पाडताना या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय निर्मितीसाठी आवश्यक इमारत, आवश्यक परिसर, आवारभिंत, शवविच्छेदनगृह इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध असताना केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर केव्हा होईल? हा प्रश्न आहे. अनेकदा ग्रामीण रुग्णालय मंजुरीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या ठरावासह शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणुकाप्र्रसंगी अनेक राजकीय पुढारी येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या संबंधी बाता मारून गेलेत. परंतु ग्रामीण रुग्णालय मंजुरीचे आश्वासन हवेतच विरले. येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीचे पाणी कुठे मुरते, हे समजने कठीण आहे. (वार्ताहर)परिचारिका काढतात वऱ्हांड्यात रात्रशासनस्तरावर आरोग्यविषयक नवे उपक्रम व योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र शासन ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे. या ठिकाणी दररोज २०० ते ३०० च्या घरात रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. मात्र या ठिकाणी खायची व्यवस्या पुरेशा प्रमाणात नाही. दर महिन्याला कुटूंब नियोजन शिबिर घेतले जाते. परिचारिकांना ड्युटी रुम नसल्याने रुग्णांच्या वार्डात किंवा वऱ्हांड्यात रात्र काढावी लागते.
ग्रामीण रुग्णालय कधी मंजूर होणार?
By admin | Updated: September 11, 2015 02:11 IST