गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते. रक्तविलगीकरणाच्या केंद्राला दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. मात्र ही मजुरीच कुठे विरघळली ते कळायला मार्ग नाही.वैज्ञानिक प्रगती साध्य केली असली तरी कृत्रिम रक्त तयार करण्यात माणूस उपयशी ठरला आहे. रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. अनेकदा रुग्णांना व्होल ब्लडसह रक्तघटकांची गरज भासते. मात्र या ठिकाणी रक्तघटक मिळत नसल्याने गरीब रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. विलगीकरण प्रक्रिया राहिल्यास एक रक्तपिशवी चार रुग्णांचा जीव वाचविते. गोंदिया जिल्हा शासकीय रक्तपेढीचे मासिक रक्तसंकलन ६०० ते ७०० रक्त युनिट इतके आहे. वर्षाला ८५०० ते ९००० रक्तयुनिट येथे जमा होते. जिल्ह्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णांची गरजदेखील हीच रक्तपेढी पूर्ण करते. परंतु अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावाने येथे रक्तविलगीकरण होत नसल्याने रक्तघटकांची पूर्तता होत नाही. ही गंभीर समस्या हजारो रुग्णांच्या जीवावर बेतते. सर्वसामान्य रुग्णांना व्होलब्लड तर मृत्यूशी झूंज देणाऱ्यांना अनेकदा रक्तघटक प्लेटलेटची गरज असते. जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अशा रुग्णांना व्होल ब्लडसह पॅकसेल हे रक्तघटक गरजेचे असतात. जळीत रुग्णांना प्लाझमा नावाचा रक्तघटक लागतो. अतिरिक्तस्त्राव होणाऱ्या रुग्णांना प्लेटलेटची गरज असते. सर्पदंश व आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांना अनेकदा स्पेशल कंपोनंट किंवा फ्रोजन प्लाजमाची गरज भासते. जिल्ह्यातील १४ लाभ लोकांची जीवनदायिनी म्हणून ज्या रक्तपेढीकडे पाहिले जाते. त्या रक्तपेढीत ही यंत्रणाच नाही. केवळ व्होलब्लड पुरविण्याची क्षमताच या रक्तपेढीत आहे. दोन वर्षापुर्वी रक्त विलगीकरण केंद्राला मंजुरी मिळाली. मात्र, मंजुरीचे घोडे कुठे अडले ते कुणालाच ठाऊक? रक्त विलगीकरण व रक्तघटक वेगळे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षितांची गरज आहे. रक्तविघटन केंद्र आल्यावर जिल्ह्यातच प्लाजमा, प्लेटलेट, रक्तकणिका अशा विविध रक्तघटकांची पुर्तता होणार आहे. विघटनाच्या प्रक्रियेअभावी ८ ते ९ हजार रक्तपिशव्या रुग्णांना कमी पडतात. रक्तविलगीकरण केंद्र सुरु झाल्यास रक्तपिशव्यांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे शासकीय रक्तपेढीला मंजूर झालेले रक्त विलगीकरण केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
गंगाबाईच्या रक्तपेढीला रक्त विलगीकरण केंद्राची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 01:52 IST