आमगाव : तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात. मात्र या संपूर्ण कार्यालयात कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ते गोंदिया व नागपूर येथे राहून ये-जा करतात. त्यांच्यावरील वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित विभागाची कारवाई गुलदस्त्यात आहे. सदर कर्मचारी सकाळी ९.३० वाजता येणाऱ्या इंटरसिटी रेल्वे गाडीने येतात, अशी अवस्था येथील कार्यरत कर्मचाऱ्यांची आहे. इंटरसिटीच्या नावावर कर्मचाऱ्यांचे चांगले चांगभल होत आहे. एकंदरीत ही गाडी व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे. आमगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर कर्मचारी जेव्हा उतरतात, तेव्हा जत्रेचे स्वरुप येते. या स्टेशनवर आमगाव, सालेकसा, देवरी या तीन तालुक्यातील कार्यरत कर्मचारी उतरतात. विशेष म्हणजे सालेकसा व देवरी तालुक्यात जाण्याकरिता काळीपिवळी गाड्या येऊन त्यांना घेऊन जातात. हा ठरलेला कार्यक्रम आहे. यात कोणताही बदल नाही. आमगाव येथे डाक कार्यालय, टेलिफोन, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. बांधकाम विभाग, बाघ इटियाडोह, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कृषी विभाग, स्टेटबँक, अर्बनबँक, बँक आॅफ इंडिया, पंचायत समिती, भूमापन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण बँक असे अनेक कार्यालय आहेत. तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा वेळापत्रक ठरलेलाच आहे. परतीच्या मार्गाला घड्याळीचे चार वाजले की ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाकडे लक्ष कमी व घड्याळाकडे जास्त असते. पहिली रिंग झाली की बरोबर त्यांच्या मोबाईलवर निरोप येतो. तेव्हा कामाचा लगबगीने सारवासारव करुन कर्मचारी कार्यालये सोडतात. काही कर्मचारी गोंदियाचे काम सांगून सरळ स्टेशन गाठून रेल्वेने निघून जातात. तसेच कधी येणारी इंटरसिटी मिळाली नाही तर कार्यालयात उशिरा येतात. तेव्हा स्वत:ला वाचविण्याकरिता कोणते तरी निमित्त सांगून कामाला लागतात. त्यावेळी एखाद्या व्यक्ती काम घेऊन गेला तर खुर्चीखाली काम थंडबस्त्यात असतो. अशी ही दयनीय अवस्था येथील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांची आहे.दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे मुख्यालयी राहतो, असे घरमालकांकडून पत्र किंवा भाडे रसिद दाखवून ‘तो मी नव्हेच’ अशा आवेशामध्ये कर्मचारी काम करतात. खरोखर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी यांना प्रशासनात पारदर्शकता अणावयाची असेल तर वरिष्ठ सर्व कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तेव्हा ‘दूध का दूध’ व ‘पाणी का पाणी’ सिद्ध होवू शकेल.(तालुका प्रतिनिधी)
मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय
By admin | Updated: December 18, 2014 22:57 IST