बाराभाटी : मोबाईल, इंटरनेटच्या या जगात रंगभूमीवरील नाट्यकलेचे आकर्षण सर्वत्र कमी होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीचा सांस्कृतिक वारसा आजही तेवढ्याच उत्साहाने जपला जातोय. ग्रामीण भागातील नागरिकांना लोककलेची भुरळ आजही आहे. त्यामुळे झाडीपट्टीत दंडारपासून नाट्यकलावंत आणि अलिकडे चित्रपट कलावंतही उदयास येत आहेत. मराठी रंगभूमी दिवस असलेल्या ५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात दरवर्षी नाटक, दंडारचे वेध लागतात. दिवाळीपासून संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात मंडईला सुरूवात होते. सर्व गावांना या निमित्ताने सांस्कृतिक महोत्सवाचे वेध लागतात. सांस्कृतिक कलेमध्ये खास थंडीच्या दिवसात दिवाळीच्या शुभपर्वावर दंडार, नाटक, पोवाडे, डहाके, भजन तर घरगुती कार्यक्रमांतर्गत तमाशा, गोंधळ, जलसे. गीतगायन, प्रबोधनात्मक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर लोककलेचे हे सर्व प्रकार झाडीपट्टीचीच नाही तर महाराष्ट्राची शान आहेत. ही परंपरा विविध कार्यक्रमातून कायमस्वरूपी जपण्याचे काम येथील रसिक नागरिक आणि कलाकार करीत आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक चित्रपट, चित्रपट निर्माते, कलाकार, गायक, गीतकार, कवी, लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार, मुकनाट्य, वगनाट्य, कलापथक तसेच झाडीपट्टी रंगभूमीवर हजारो कलावंत तयार झाले. हौसी कलाकारांची तर चळवळच प्रस्थापित आहे. तसेच आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्य टिपणारे साहित्यिक सुध्दा खेड्यापाड्यातून मराठी रंगभूमीच्या व्यासपीठावर आरूढ झाले आहेत. कलावंत, साहित्यिकांना, लेखक, कवी, गीतकार, प्रबोधनकार वक्ते, सांस्कृतिक महोत्सवाच्या अनुषंगाने सामाजिक ऋण फेडण्याचे काम करीत आहेत. केवळ व्यावसायिक उद्देश न ठेवता रंगभूमीला सामाजिक जनजागृतीचे व्यासपिठ बनविण्याचे काम येथील कलावंतांना केले आहे. इलेक्ट्रॉनिक जगाचे कितीही आक्रमण झाले तरी जिल्ह्यातील रसिकांच्या जोरावर झाडीपट्टीत रंगभूमीचा वसा कायम जपला जाणार आहे.(वार्ताहर)
झाडीपट्टी जपतेय लोककलेची परंपरा
By admin | Updated: November 5, 2015 02:09 IST