कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्यामुळे कोरोनाला आपला डाव साधण्यात यश आले. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमात्र उपाय सांगितला आहे. तेव्हापासूनच शासनाने लसीकरणाची गती वाढवून दिली आहे. जिल्ह्यातही लसीकरणासाठी चांगलेच प्रयत्न केले जात असून, याचे फलित असे की, आतापर्यंत ९,६८,९३६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
यात ७,०६,०५५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६८ एवढी टक्केवारी आहे, तर फक्त २,६२,८८१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्यांची २५ एवढी टक्केवारी आहे. म्हणजेच, पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी आतापर्यंत दुसरा डोस घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे इतरांना आपल्यापासून धोका होऊ नये यासाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे. मात्र, ही बाब आतापर्यंत नागरिकांना समजली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे की, दुसरा डोस घेणाऱ्यांची आकडेवारी वाढता वाढेना असेच दिसत आहे.
-----------------------------------------
बाधितांची वाढती आकडेवारी धोक्याची
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. ही नक्कीच धोक्याची बाब असून, त्यात टेन्शन असे की, आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया तालुक्यातही कोरोनाने पुन्हा एंट्री केली आहे. गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असून, येथेच पहिल्या व दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यात आता बाधितांची वाढती आकडेवारी बघता नागरिकांनी खबरदारी व लस यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
------------------------------------
हातचे काम सोडा; पण लस घ्या
सध्या जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून, आता बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. यानंतरही कित्येक नागरिक आता कोरोना गेल्याच्या संभ्रमात आहेत. लस घेतल्याने ताप येणार व काम अडकणार यासह अन्य काही कारण पुढे करून लस टाळत आहेत. मात्र, कामाच्या नादात ते स्वत:सह कुटुंबीयांना धोक्यात टाकत आहेत. याकरिता कोरोनापासून बचावासाठी आता हातचे काम सोडून अगोदर लस घेण्याची नितांत गरज आहे.