१५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार सोडणार पाणी : प्रकल्पांमध्ये २५ टक्के उपयुक्त जलसाठा गोंदिया : गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत उन्हाळी सिंचन चार पटीने वाढणार आहे. येत्या १५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्यावर्षी जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत खराब होती. उपयुक्त जलसाठाच नसल्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून गेल्यावर्षी अवघ्या ११८० हेक्टरला पाणी देण्याचे नियोजन केले होते. यावर्षी मात्र पावसाळ्यात योग्यवेळी पाऊस झाल्याने खरीब हंगामात पिकांसाठी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. परिणामी जलाशयांमध्ये जलसाठा कायम राहिला. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून यावर्षी उन्हाळी धानासाठी ४०६० हेक्टरला सिंचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ईटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, धापेवाडा आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर या सहा मोठ्या प्रकल्पांमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी कालीसरार वगळता इतर सर्व जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यात ईटियाडोह प्रकल्पात आता १३०.४० दलघमी (४१ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी तो अवघा ५६.८४ (७.८२ टक्के) होता. शिरपूर जलाशयात ४८.९७ दलघमी (३०.६५ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी त्या जलशयात अवघा १०.६० दलघमी (६.६४ टक्के) जलसाठा होता. पुजारीटोला धरणात २३.५६ दलघमी (५४.१२ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास एवढाच म्हणजे २३.६८ दलघमी जलसाठा होता. कालीसरार धरणात मात्र यावर्षी कोणताही जलसाठा शिल्लक नाही. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पात १२.८५ दलघमी (२९.१८ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी या जलाशयात आताच्या पेक्षा जास्त म्हणजे १५.६४ दलघमी (३४ टक्के) जलसाठा होता. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून गोंदिया जिल्ह्याला पाण्याचा वाटा मिळतो. त्या जलाशयात आता १६.६४ दलघमी (४ टक्के) उपयुक्त दलसाठा आहे. गेल्यावर्षी याचवेळी २.७४ दलघमी (०.६७ टक्के) होता. (जिल्हा प्रतिनिधी) पाणी पोहोचतच नाही यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त आहेत. त्या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे पाणी सोडूनही ते कालव्यातून वाहत पुढे न जाता मध्येच झिरपते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी पोहोचणे कठीण जात आहे.
यावर्षी उन्हाळी सिंचनात होणार चारपटीने वाढ
By admin | Updated: April 22, 2017 02:30 IST