विजय मानकर
सालेकसा : खऱ्या जमीनमालकाच्या जमिनीचा सातबारा एखाद्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर ऑनलाइन करून त्या बोगस शेतकऱ्याशी संगनमत करुन आपला धान मोठ्या प्रमाणावर सोसायटीमध्ये विकण्याचा डाव व्यापारी-दलाल खेळत आहे. या बोगस व्यवस्थेमुळे खरा शेतकरी आपला शेतमाल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विकण्यापासून वंचित राहणार असून, अशा हजारो इमानदार शेतकऱ्यांवर भुर्दंड बसणार आहे. दुसरीकडे तालुक्यात पुन्हा धान खरेदी-विक्रीचे घोटाळे होण्याची चिन्हे दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या नवीन सोसायट्यांना धान खरेदी केंद्र मिळाले आहे तेथेच असे कार्य मोठ्या प्रमाणात होत आहेत.
आधीपासूनच धान खरेदी घोटाळ्यासाठी बदनाम असलेल्या सालेकसा तालुक्यात मागील वर्षी काही नवीन धान खरेदी केंद्रांना शासनाने मंजुरी दिली. तेव्हा असे वाटत होते की धान खरेदी केंद्रावरील घोटाळे कमी होतील व खरा मालक आपला शेतमाल सहज विकू शकेल. परंतु व्यापाऱ्यांचा धान खरेदी केंद्रांसोबत संगनमताने बोगस कामे करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधल्यामुळे खरा शेतकरी अन्यायाखाली दाबला जात असून, अशा गैरव्यवहारांमागे राजकीय नेत्यांचे सुद्धा वरदहस्त आहे असे सुद्धा दिसून येत आहे.
तालुक्यातील ग्राम कुणबीटोला येथे मागील वर्षी एक नवीन धान खरेदी केंद्र मिळाले असून, तेथे नेहमी व्यापाऱ्यांचा बोलबाला असल्याने आपला धान विक्री व्हावा म्हणून ते कोणताही फंडा खेळतात. तेथील एका व्यापाऱ्याने घरच्या म्हशी चारण्यासाठी ठेवलेल्या नोकराच्या नावावर तब्बल आठ एकर जमिनीचा सातबारा ऑनलाइन करून टाकला आहे. वास्तविक पाहता त्या नोकराच्या मालकीची जेम-तेम दीड एकर जागा आहे. बाकीची शेतजमीन त्याच्या मोहल्यात राहणाऱ्या इतर शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. रक्तातल्या नात्यातील असल्याने त्याचे नाव मोहल्लतल्या इतर शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील सातबाऱ्यात आहे. परंतु त्या जमिनीवर हक्क नसून सुद्धा आपल्या नावावर सातबारा ऑनलाइन करवून टाकला आहे.
बोनसची अर्धी रक्कम देण्याची लालच देऊन त्या व्यापाऱ्याने ज्या-ज्या ठिकाणी त्याचे नाव सातबाऱ्यावर आहे. त्या-त्या जमिनीचे सातबारा गट व खाता क्रमांक गोळा करुन सोसायटीच्या ऑफिसमध्ये सातबारा ऑनलाइन करवून घेतला. जेव्हा त्या-त्या जमिनीचे मालक शेतकरी आपल्या गटाचा सातबारा ऑनलाइन करायला गेले. तेव्हा तुमचा सातबारा आधीच दुसऱ्याच्या नावे ऑनलाइन झाले असून, तुमच्या नावाने ऑनलाइन होऊ शकत नाही असे म्हणत इतर सर्व शेतकऱ्यांना परत पाठविण्यात आले. कुणबीटोला (गोवारीटोला) येथीलच एका शेतकऱ्याकडे फक्त अर्धा एकर जागेवर मालकी हक्क असून, इतर शेतकऱ्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर शामिल खात्यात नाव आहे. त्यांनी सर्वांचे सातबारे गोळा करुन व्यापाऱ्याला देऊन टाकले. असे अनेक प्रकार तालुक्यात घडत असून व्यापाऱ्यांच्या बदमाशीमुळे खऱ्या जमीन मालकांचा मोठे नुकसान होत आहे. एका बोगस शेतकऱ्याने तर त्याच्या वडिलांचे नाव असले तरी व त्याच्या मालकीची जागा नसली तरी स्वत:चा आधार कार्ड न टाकून सातबारा ऑनलाइन करून टाकला आहे व यासाठी एका व्यापाऱ्याने त्याला मदत केली, अशी माहिती आहे.
----------------------------
बॉक्स