माध्यमिक विभागाला रिक्त पदांचे ग्रहण : प्राथमिकला मात्र अतिरिक्त शिक्षकवर्गगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एकीकडे प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा भरणा झालेला असताना दुसरीकडे माध्यमिक विभागात शिक्षकांचा तुटवडा पडला आहे. जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये आजघडीला ९४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शाळेत विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनाऐवजी शाळारूपी कोंडवाड्यात विद्यार्थ्यांची केवळ राखण करण्याचा प्रकार सुरू आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे २२ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात जिल्ह्यातील हजारो गोरगरीबांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नियुक्ती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत.२२ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ३६८ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी २७४ शिक्षकच कार्यरत आहे. म्हणजेच शिक्षकांचे ९४ पदे रिक्त आहेत. यामुळे जि.प. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन कितपत होत असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्राथमिक विभागात अतिरिक्त शिक्षक असून त्यांचे पात्रतेनुसार माध्यमिक विभागात समायोजन करणे गरजेचे आहे. पण त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत.एकंदरीत जिल्हा परिषदेकडे पुरेसा शिक्षकवर्ग उपलब्ध असूनही फक्त अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या निरूत्साहीपणामुळे हायस्कूलवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा डबघाईस आल्या आहेत. सदर वस्तुस्थितीकडे जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांची होत असलेले शैक्षणिक नुकसान दूर करावे अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे. याप्रकरणी शिक्षण सभापतींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)वर्षभरात ४७ शिक्षक सेवानिवृत्तजून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत हायस्कूलवर कार्यरत सुमारे ४७ शिक्षक सेवानिवृत्त झालेत. वर्ष २०१४ मध्ये ८ तर वर्ष २०१५ मध्ये ७ शिक्षकांना प्राचार्यपदी बढती देण्यात आली. यामुळे आपसूकच हायस्कूलवरील शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. जि.प. हायस्कूलवर नवीन पदभरती करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळत नसल्याचे वृत्त आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची मागणी जनसामान्यातून केली जात आहे. प्राथमिकमध्ये ९४ शिक्षक अतिरिक्तविशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे ९४ शिक्षक अतिरीक्त आहेत. प्राथमिक विभागात कार्यरत अनेक शिक्षक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर कार्य करण्यास शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या पात्र असून इच्छुकही आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर कार्य करण्यास पात्र बी.एड्., एम.एड्. व इतर उच्चशिक्षीत शिक्षकांची मोठी फौज प्राथमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध असतानाही सदर शिक्षकांना उच्च माध्यमिक शाळांवर नियुक्ती देण्यास शिक्षण विभाग निरूत्साही दिसत आहे.
प्राथमिक तुपाशी, माध्यमिक उपाशी
By admin | Updated: August 21, 2015 02:10 IST