कत्तलीसाठी विक्री : शेकडो जनावरे बाजारातून कत्तलखान्याकडेगोंदिया : काही वर्षापूर्वी जनावरांची किमत ही दुधावर आणि त्यांच्या जातीवरुन ठरत होती. पण सध्या तीच किमत आता जनावरांच्या वजनावरून ठरत असल्याने पालनाऐवजी कत्तलीसाठी जनावरांची खरेदी होत असल्याचे चित्र दिसून येते.एखाद्या गाईला वासरु झाल्यानंतर त्याच दिवशी त्या गावातील एखादा दलाल येऊन वासरू देणारा का, असा प्रश्न शेतकऱ्याला विचारतो. शेतकरीही या निरुपयोगी प्राण्यास दररोज किमान दोन लिटर दूध घालण्याऐवजी देऊन टाकतो. याचे कारण म्हणजे किमान दोन महिने याला दूध घातल्यास पाच हजार रुपयांचे नुकसान होणार, शिवाय वैरण व इतर खर्च वेगळा. असा विचार करुन तो ते लहान वासरु दलालाला देतो. तो दलाल अशी चार-पाच वासरे जमा करुन कसायाला विकतो. असे या कसायाचे गावोगावी जाळे पसरले आहे.सध्या जनावरांच्या मांसाला चांगली किंमत व मुबलक मागणी असल्याने भाकड जनावरांसह दुधाळ आणि गाभण जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. यावरुन मोठ्या शहरात किती जनावरे लागत असतील, याची कल्पना न करणे बरे. दर आठवड्याला प्रत्येक बाजारातून शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. बाजारात जास्तीत जास्त धष्ठपुष्ठ असणाऱ्या जनावरांवर या व्यापाऱ्यांचा डोळा असतो. मग ते जनावर गाभण असले तरी कापण्यासाठी नेले जाते. एखाद्या जनावराची किमत तिचे दूध पाहता १५ हजार असेल तर तेच जनावर कत्तलखान्यासाठी तीन हजार रुपयांत खरेदी केले जाते. त्यात जनावरांचे मांस, हाडे, चरबी, चमडे याची किंमत एकत्रित केली असता त्याची किंमत ६० हजार होते. म्हणजे जनावराची किंमत चौपट होते. एक जनावर कमीत कमी चाळीस किलो ते सहाशे किलोपर्यंत वजनाचे असते. त्यामुळे किंमत दीड लाखांपर्यंत जाते. एखाद्या चांगल्या जनावरांची किंमत देऊन ते घेण्यासाठी शेतकरी असमर्थ आहे. तर एकीकडे जनावराला अधिक किंमत येत असल्याने आनंदाने विकणारा शेतकरीच आहे.त्यामुळे जनावरांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाने कत्तलखान्यांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. गाभण, दुध देणारे जनावर कापण्यावर दंड आकारणे गरजेचे आहे. तर कत्तलखाने चालविणाऱ्यांनी उपयोगी जनावरे न घेता केवळ भाकड व निरुपयोगी अशी जनावरे खरेदी करावीत. अशी सक्त ताकीद या दलालांना देण्यात यावी. (शहर प्रतिनिधी)
जनावरांची किंमत ठरतेय वजनावर
By admin | Updated: April 21, 2016 02:13 IST