अर्जुनी-मोरगाव: महिलेच्या पोटात गर्भ असतानाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची घटना प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी येथे घडली. पीडित महिलेचे नाव शैला प्रकाश सुखदेवे असे आहे. सध्या ती साडेसहा महिन्यांची गर्भवती आहे. आरोग्य विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षित कारभाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सदर महिलेचे पती प्रकाश सुखदेवे यांनी पालकमंत्र्यांसह संबंधित वरिष्ठाकडे केली आहे.प्राप्त माहितीनुसार, सिरेगावबांध येथील शैला प्रकाश सुखदेवे या महिलेने दोन अपत्यानंतर २६ नोव्हेंबर २०१४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-गाकटी येथे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्याला शैलाच्या पोटात गोळा असल्याचे दिसून आले. त्यांनी तो कशाचा गोळा आहे. याकडे लक्ष न देता तिची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर चार महिन्याने तिच्या पोटात दुखणे सुरु झाले. तेव्हा भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील नाफडे नर्सिंग होममध्ये शैलाला उपचारासाठी नेण्यात आले. डॉ.पल्लवी नाफडे यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. ३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सोनोग्राफीत शैलाच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे दिसून आले. याचा अर्थ ज्यावेळी शैलाची शस्त्रक्रिया झाली त्यावेळी तिला एक ते दीड महिन्यांची गर्भधारणा झाली होती. शस्त्रक्रियेपुर्वी झालेल्या तपासणीत त्या गोळ्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे शैलाच्या प्रकृतित मात्र बिघाड झाला आहे. शैला ही दारिद्रयरेषेखालील परिवारात मोडत असून खालावलेल्या प्रकृतिवर खर्च करण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. तिच्या आरोग्याला धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य विभागाची राहणार आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी प्रकाश सुखदेवे यांनी सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री, खा.नाना पटोले, गोंदियाचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, मुंबई राज्यमहिला आरोगाच्या अध्यक्ष तसेच गोंदिया जि.प.च्या आरोग्य सभापतींकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)चौकशी समिती नियुक्तसिरेगावबांध येथील गर्भवती महिलेची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे आपल्या कानावर आले होते. मी माहिती घेतली. शैला या प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाकटी येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आल्या. त्यांची युपीटी (युरिन पे्रेग्नन्सी टेस्ट) केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. वैद्यकीय अकधारी व त्या महिलेला सुद्धा गर्भधारणा असल्याची माहिती नव्हती. त्यामुळेच ती शस्त्रक्रियेसाठी तयार झाली. युपीटीवर विश्वास ठेवून शस्त्रक्रिया करण्यात आपी. या प्रकरणात चौकशीचे आदेश मिळाले. चौशी समितीत मी स्वत: तसेच गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर हे आहेत. चौकशीत काय निष्पन्न होते ते नंतरच सांगता येईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार यांनी दिली.आरोग्य कर्मचाऱ्यांचा खेळखंडोबासोनोग्राफी करतेवळी मासिक पाळी थांबण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर सांगण्यात आली. याविषयी चान्ना-बाकटी येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. ते आता चूक झाली असावी असे सांगतात. वेळ गेली नाही, गर्भपात करुन घ्या, असाही सल्ला त्यांनी दिला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही महिलांना ५ ते ६ महिन्यापर्यंत मासिक पाळी येत नाही असे परिचारीका खराबे यांनी सांगून या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शस्त्रक्रियेपुर्वी शासनातर्फे पुरविलेल्या गर्भतपासणी संचाद्वारे व इतर चाचण्या योग्यरित्या केल्या गेल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा आकडा वाढविण्यासाठी झटपट शस्त्रक्रिया आटोपण्याच्या नादात शैलाच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप शैलाचे पती प्रकाश सुखदेवे यांनी केला आहे.
गर्भवतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
By admin | Updated: May 20, 2015 01:35 IST