इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची गळचेपीगोंदिया : पूर्वी शाळा सुटल्या की गावाबाहेरील मैदानात देशी खेळ खेळणारे, सवंगड्यांसह मौजमस्ती करणारे, वडाच्या पारण्याला झोके घेणारी मुले आज कॉन्व्हेन्ट संस्कृतीत हरविल्याचे निदर्शनात येत आहे. याउलट आज कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकासोबत पूर्ण वेळ शाळेत घालवून परत घरी आल्यावर मुले २-३ तास गृहपाठ पूर्ण करतात. यात तो विद्यार्थी पूर्णत: थकलेला असतो.परंतु शिकवणी वर्गाच्या फॅडमुळे दोन तास त्याला ट्युशनमध्येही घालवावे लागतात. भल्या सकाळी झोपेतून उठून आलेल्या मुलाच्या पाठीवर ७ ते ८ किलो वजनाचे दप्तर देऊन ओझ्याखाली लडखडत कॉन्व्हेंटच्या दिशेने जाणारा विद्यार्थी व त्याला 'बाय' करणारे पालक आज सर्वत्र हमखास दृष्टीपथास पडत आहेत.वाढत्या कॉन्व्हेंटच्या फॅडमुळे मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी डिंडोरा पिटणारे महाराष्ट्रातील नेते हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शासनाकडून कॉन्व्हेंटला मुक्त हस्ते परवानगी मिळत असल्याने गावखेड्यातही 'मिनी शिक्षण सम्राट' तयार झाले आहेत. आज इंग्रजी शिक्षणाच्या नावावर पालकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू आहे. पालकाकडून विविध सुविधाच्या नावावर महिन्याकाठी ३०० ते ५०० रुपये शुल्क घेणे, शाळेतच गणवेश व पुस्तकांची दुकानदारी सुरू करणे, छोट्याशा खोलीत दाटीदाटीने बसविणे यासारखे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अध्ययन करणाऱ्या शिक्षकांना २, ३ हजार रुपए देऊन वेतन देऊन त्यांचे आर्थिक शोषण केल्या जात आहे.आज जिल्ह्यात शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून शेकडो कॉन्व्हेंट सुरू आहे.विद्यार्थ्यांचा मानसशास्त्राचा मुळीच विचार केल्या जात नाही.कधीकाळी ग्रामीण भागाचे वैभव असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज ओस पडल्या आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या मोठ्याा खोल्याच्या इमारतीत फक्त ५ ते १० विद्यार्थ्यांना अध्ययन करीत असल्याचे चित्र आहे. पूर्वी याच शाळेमधून शिक्षण घेत विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक झालेले आहेत.केवळ त्याचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो तर माझा मुलगा का नाही? या विचाराने सर्वसामान्य पालक झपाटलेला आहे.परंतु पालक, शिक्षक, शासन यांचा हट्टाच्या जात्यात निरागस बालक व त्यांचे बालपण भरडले जात आहेत.खेळण्या बागडण्याचा वयात त्याचेवर मोठे ताण देत असल्याने आपण मुलावर कोठेतरी अन्याय तर करीत नाही ना? ही जाणीव सुज्ञ नागरिकही ठेवत नसल्याचे दिसून येत नाही. काही कॉन्व्हेंटमध्ये तर इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मराठी शब्दच विसरल्याचे वास्तव आहे. पालकांनाही आपला मुलगा सुदृढ, बलवान, आदर्श नागरिकापेक्षा इंग्रजीत पोपटपंची करणाराच आवडत आहे. (नगर प्रतिनिधी)
कॉन्व्हेंट संस्कृतीत मैदानी खेळ झाले हद्दपार
By admin | Updated: July 22, 2015 02:06 IST