गोंदिया : राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे पुन्हा वाढू लागले असल्याने सर्वत्र धास्तीचे वातावरण असतानाच जिल्ह्यातही शुक्रवारी नवीन बाधित संख्या जास्त, तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसले. शुक्रवारी जिल्ह्यात सहा नवीन बाधितांची भर पडली असतानाच दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४३१४ झाली असून, यातील १४०७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता जिल्ह्यात ५६ क्रियाशील रुग्ण उरले आहेत.
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून त्यातही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती दिसून येत आहे. अशात राज्य शासनाने खबरदारी म्हणून पुन्हा एकदा निर्बंध लावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात कोरोना नियंत्रण दिसून येत असून, दररोज बोटांवर मोजण्याएवढेच रुग्ण निघत आहेत. मात्र त्यात कधी-कधी बाधितांची संख्या जास्त व मात करणारे निघत असल्याचे धडकी भरते. त्यानुसार, शुक्रवारी जिल्ह्यात सहा नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील दोन, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चार रुग्ण आहेत. तसेच दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील एक, तर इतर जिल्हा व राज्यातील एक रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यात ५६ क्रियाशील रुग्ण असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४५, गोरेगाव येथे २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव ५ तर इतर राज्य व जिल्हयातील १ रूग्ण आहे. विशेष म्हणजे, यातील ३७ रुग्ण घरीच असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३३, गोरेगाव १, सालेकसा १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत,. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ०७.२ टक्के असून, मृत्युदर १.२० टक्के आहे. शिवाय द्विगुतीत गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.
-----------------------------
आतापर्यंत १३६२३६ चाचण्या
जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात असून आतापर्यंत १३६२३६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ६८७१२ चाचण्या आरटी-पीसीआर असून यामध्ये ८४४९ चाचण्या पॉझिटिव्ह, तर ५७०२४ निगेटिव्ह आहेत. तसेच ६७५२४ चाचण्या रॅपिड ॲंटिजेन असून यांतील ६१५८ चाचण्या पॉझिटिव्ह, तर ६१३६६ निगेटिव्ह आहेत.
--------------------------
१८४ रुग्णांचा कोरोनाने घेतला जीव
जिल्ह्यात आतापर्यंत १८४ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०२, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ११, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.