ँमुरलीदास गोंडाणे इंदोरा बु.दरवर्षी धानशेती करून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कंटाळून तिरोडा तालुक्याच्या सोनेगाव येथील डॉ. एम.डी. पटले फळबागेकडे वळले. त्यांनी आपल्या साडे सहा एकर शेतजमिनीत पपईच्या झाडांची शेती फुलविली. त्यातून त्यांना १५ लाख रूपयांचे उत्पन्न होणार आहे.डॉ. पटले या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतीवर आधुनिक तंत्र पद्धतीचा अवलंब करून प्रथमच पपईची लागवड केली. धान शेती परवडत नसल्याने फळ शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला. सदर प्रतिनिधीने त्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली व पपई लागवडीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, धानाच्या बांध्यांचे सपाटीकरण करून या साडे सहा एकर शेतीमध्ये एका विशिष्ट जातीच्या सहा हजार पपईच्या झाडांची लागवड केली.पपईचे रोपटे नागपूर येथून आणण्यात आले होते. कृषी अधिकारी पोटदुखे व कृषी निरीक्षक खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली ही फळबाग लावण्यात आली. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभत आहे. शेतामधील बोअरवेलच्या माध्यमातून ठिंबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या पपईची झाडे सहा महिन्यांचे झाले असून त्यांना फळेसुद्धा लागली आहे. ही फळे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यावेळी ही फळे नागपूरच्या बाजारात पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. धानाची शेती केल्याने पाहिजे तेवढे उत्पादन मिळत नव्हते. परंतु आधुनिक पद्धतीने फळ शेती केल्यास शेतकऱ्यांना लाभ निश्चित होतो, हे या पपईच्या पिकावरून दिसून येते. पटले यांच्या बागेत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने फळांची, हळद, केळी आदी पिकांची शेती करावी, असा ते सल्ला देतात.
धानाने केले निराश, पपईची आस
By admin | Updated: January 22, 2015 01:26 IST