नामदेव हटवार सालेकसा तालुक्यात डिसेंबर -जानेवारी महिन्यात केंद्रस्तरावर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडले. पण या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या नावाखाली अनेक नेत्यांनी आपले राजकारण करण्याचा प्रयत्न करुन प्रत्येक कार्यक्रमाला ४०-५० नावे कार्यक्रम पत्रिकेत आयोजकांना टाकायला लावली. कार्यक्रमाचे आयोजन करता-करता आयोजकांची तारांबळ उडते, त्यातच अनेक नावे कार्यक्रम पत्रिकेत टाकायचा प्रयत्न नेते मंडळी करीत असतात. त्यामुळे गुरुजींची गोची होते आणि कार्यक्रम पत्रिका ही हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाते. गोर्रे येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला. आयोजकांनी यात उद्घाटनासाठी जी पत्रिका बनविली त्यात पाहुण्यांची तब्बल ११० नावे होती. कदाचित हा रेकॉर्ड असावा की इतकी नावे उद्घाटनासाठी टाकण्यात आली. गिनिज बुकात ही कार्यक्रम पत्रिका सामील होऊ शकते अशी चर्चा ती पत्रिका पाहून होती त्यावरून काय ते लक्षात येऊ शकते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्राथमिक विभागात एकूण २६ पाहुण्यांची नावे आहेत. शो-ड्रिल प्रेक्षणिय कवायतीसाठी उद्घाटन पत्रिकेत ३५ पाहुण्यांची नावे होती. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी एकूण ५५ पाहुण्यांची नावे होती. बक्षीस वितरण कार्यक्रम पत्रिकेची वैशिष्ट्ये अशी होती की सालेकसा तालुक्यातील एकुण ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना यासाठी बोलाविले होते. हा सुद्धा एक विक्रमच म्हणायला पाहिजे की, सर्वच तालुक्यातील सरपंचांची नावे बक्षीस वितरण पत्रिकेत आली. काही ठिकाणी जे आयोजक विनितमध्ये आहेत, त्यांचीही नावे प्रमुख पाहुणे, पुरस्कार वितरण, विशेष पाहुणे, अध्यक्षपदासाठी ठेवण्यात आलेली आहेत. असा हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव चर्चेचा विषय झाला. या कार्यक्रम पत्रिकेत पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा विचार करुन प्रभाव पडलेला दिसला. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी असले तरी विद्यार्थ्यांचा योग्य तो विचार करण्यात आलेला नाही. जास्त पाहुण्यांमुळे कार्यक्रमाला उशिर होतो, विद्यार्थी व शिक्षकांना ताटकळत रहावे लागते याचाही विचार आयोजकांनी केला नाही. वेळेवर स्पर्धा सुरु होत नाही व संपत नाही, नियोजन अयशस्वी ठरते, थंडीत विद्यार्थ्यांना त्रास होतो, याचे भान कुणालाही नव्हते. कार्यक्रम पत्रिकेमुळे किती मंडळींना खुश केले याच आनंदात आयोजक दिसून येत होते. परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी या कार्यक्रमातून किती प्रयत्न केले ते मात्र सांगता येत नाही. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याचे मंथन झाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना काय मदत करायची यावर चर्चा करायला पाहिजे. पण तेच होत नाही. या महोत्सवानिमित्ताने नेत्यांचे महोत्सव होत असल्याचे दिसून येते. प्रत्येक केंद्रनिहाय उद्घाटनात पाहुण्यांची आकडेवारी ४० च्या पुढेच होती. झालियात ४०, कोसमतर्रात ४३ नावे उद्घाटनासाठी दिसली. त्यातही प्रत्येक राजकिय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांची नावे टाकून कार्यक्रमाची वाटणी केली जाते.अधिकाऱ्यांचीही कार्यक्रमात वाटणी होते. अशी अनेक नावे टाकली जातात की त्यांना माहित नसते की कार्यक्रम पत्रिकेत त्यांनी नावे आहेत. काहींची नावे फक्त हौस म्हणून पत्रिकेत टाकली जातात. या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांची मात्र पंचाईत होते. कमी जास्त झाले, अज्ञानातून चुका झाल्या तर त्याचे खापर शिक्षकांवर फुटते. सगळा दोष शिक्षकांवर लादल्या जातो. तरी हा प्रकार विद्यार्थी हित बघता बंद व्हायला पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे.
क्रीडा महोत्सव की नेते महोत्सव ?
By admin | Updated: January 23, 2015 01:29 IST