बुडतोय कोट्यवधींचा महसूल : ग्रामीण भागातील रस्त्यावरून नेली जातात वाहनेसिरपूर/बांध : येथील आरटीओ चेकपोस्टवर शासनाच्या तिजोरीची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. चेकपोस्टच्या मागील रस्त्याने अवैध जड वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सोबतच राष्ट्रीय महामार्गावरून दररोज रात्रीच्या वेळी कितीतरी ओव्हरलोड ट्रक सरळ निघतात. या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे. हा सर्व प्रकार येथील अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर होत आहे. पण त्या प्रकाराकडे तेथे कार्यरत अधिकारी मुद्दाम डोळेझाक करीत आहेत. सदर चेकपोस्ट तयार करण्याकरिता शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या संगणीकृत चेकपोस्टचे बांधकाम आणि देखभाल दुरूस्तीचे काम सेवा पुरवठादार सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता देण्यात आले आहे. सदर कंपनी चेकपोस्टला सर्व सेवा पुरवित आहे आणि टोलवसुलीसुध्दा सदर कंपनीच्या माध्यमातून होत आहे. सदर चेकपोस्टला चुकवून रात्रीच्या वेळी काही ट्रक सरळ राष्ट्रीय महामार्गाने निघतात. परंतु यांना कुणीही थांबवत नाही. सदर प्रकरणाबद्दल सद्भाव कंपनीतर्फे चेकपोस्टवर नेमण्यात आलेल्या प्रमुखांना विचारले असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यावरून सदर अवैध वाहतूकदारांसोबत त्यांचे सूर जुळले असल्याचे दिसून येते. एवढा मोठा प्रकार होऊन सुध्दा पोलीस तक्रार करण्यात आली नाही. सीमा तपासणी नाक्यावर याच सद्भाव कंपनीतर्फे सेवा पुरविण्यात येत आहे. सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत मोटारवाहन निरीक्षकांनी सदर प्रकरणाची लिहीत तक्रार बीसीपी हेड यांच्याकडे केली. परंतु तक्रारीची कसलीही दखल घेण्यात आली नाही. या संदर्भात कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे सदर कंपनीची सीमा तपासणी नाक्यावर सर्व सेवा, सुविधा, सुरक्षा देण्याची जबाबदारी आहे. परंतू सद्भाव कंपनीतर्फे असे होताना दिसत नाही. सदर सीमा तपासणी नाक्याच्या आजूबाजूच्या मार्गाने चोरटी वाहतूक नेहमीच बघावयास मिळते. होणाऱ्या चोरट्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शासन निर्णयानुसार वायूवेग पतकाची नेमणूक व्हायला पाहिजे होती पण तेही करण्यात आलेले नाही. परिणामी शासनाच्या मोठा महसूल बुडत आहे. सदर सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत वाहन निरीक्षकांनी सांगितले की, सिमांत पाहणी नाक्यावर मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे सदर प्रकरणात कारवाई करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर सिमा तपासणी नाक्यावर कार्यरत सुरक्षा रक्षकाच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे ट्रक लावण्यात आलेले बॅरीगेट्स उडवत सरळ निघतात आणि त्यामुळे येथे कार्यरत सुरक्षा रक्षकाच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदार कोण राहील? असा सवाल उपस्थित होत आहे. सिमा तपासणी नाक्यावरील सुरक्षा रक्षकाच्या सोईकरिता आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी. येथील सुरक्षा रक्षक उन्हात, पावसात त्रास सहन करीत असतात असे तेथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. हा गंभीर असून शासनाने याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे. हा सीमा तपासणी नाका चुकवून सरळ मार्गाने वाहने वळविण्यात काही दलाल सक्रिय झाले असल्याचे कळते. त्यामुळे सदर प्रकरणावर योग्य त्या कार्यवाहीची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कुंभकर्णी निद्रावस्थेत गेलेय प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:55 IST