विद्यार्थी वंचित : महिना झाला तरी बससेवा नाहीगोंदिया : यावर्षीचे नवीन शालेय सत्र २६ जूनपासून सुरू झाले. पाहता पाहता त्याला एक महिन्याचा कालावधी लोटला, मात्र सालेकसा व गोरेगाव तालुक्यात मानव विकास कार्यक्रमाच्या ‘स्कूल बसेस’ सुरूच करण्यात आल्या नाहीत. त्याबाबतचे पत्र दोन्ही तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांनी गोंदिया आगाराला पाठविलेच नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेचा फटका दोन्ही तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाणे सोयीचे व्हावे यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी २० स्कूल बसेस गोंदिया आगाराला पुरविल्या होत्या. यातून वर्ग आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवास करण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागे उद्देश आहे. २६ जून रोजी नवीन शालेय सत्र सुरू झाल्यावर गोंदिया आगारामार्फत गोंदिया व आमगाव या दोन तालुक्यात मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र गोरेगाव व सालेकसा तालुक्यातील खंडविकास अधिकाऱ्यांनी स्कूल बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र जवळपास महिना भरत असतानाही गोंदिया आगाराला पाठविले नाही. उलट गोंदिया आगार व विभागीय आगारातून त्यांना विद्यार्थ्यांच्या सेवेत बस सुरू करण्यासाठी दोन-तिनदा पत्र पाठविण्यात आले. मार्ग रेखांकनाची माहितीच नाहीचार तालुक्यांसाठी पूर्वीच मानव विकास कार्यक्रमाच्या २० बसेस होत्या. आता त्यात पुन्हा वाढ करण्यासाठी आणखी आठ बसेस मिळणार आहेत. त्यापैकी दोन स्कूल बसेस गोंदिया आगाराला उपलब्ध झाल्या आहेत. मात्र मार्गांची रेखांकित माहिती मिळाली नसल्याचे आगार व्यवस्थापक शेंडे यांनी सांगितले. कोणकोणत्या मार्गांवरून या बसेस धावणार याची माहितीच नसेल तर त्या बसगाड्या कशा सुरू करायच्या, असा प्रश्न आगाराला पडला आहे. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होवून सोमवारपासून त्या बसेस सुरू होवू शकतील, असे शेंडे यांनी सांगितले. २० बसेसद्वारे वर्षभरात ९४.३५ लाखांचे उत्पन्नगोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या आतापर्यंत २० स्कूल बसेस धावत होत्या. यातून विद्यार्थ्यांचा मोफत प्रवास होत होता. मात्र शैक्षणिक सत्र संपल्यावर त्या गाड्या प्रवाशी सेवेसाठी वापरल्या जात होत्या. शिवाय इतर रिकाम्या वेळेतही त्यांचा प्रवासी सेवेसाठी उपयोग केला जातो. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमाच्या सदर बसेस १० लाख दोन हजार ९९० किलोमीटर धावल्या. तिकीट विक्रीतून त्यांच्याद्वारे गोंदिया आगाराला सदर वर्षभरात ९४ लाख ३५ हजार ८५७ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
मानव विकासच्या बसेसला ‘जामर’
By admin | Updated: July 24, 2015 01:17 IST