दिवाळीच्या सुट्यांत कपात : बदलत्या शिक्षण प्रणालीचा परिणाम गोंदिया : बदलत चाललेल्या शिक्षण प्रणालीमुळे चिमुकल्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे वाढत असतानाच आता त्यांच्या सुट्यांवरही गाज पडत आहे. पूर्वी १५-२० दिवस मिळत असलेल्या दिवाळीच्या सुट्या आता जेम-तेम ८-१० दिवसांपासून आल्या आहेत. एकंदरीत या शिक्षण प्रणालीमुळे मात्र आजची पिढी पारंपारिक सणांसोबत नातेसंबंधांपासूनही परावृत्त होत चालली असल्याचे दिसून येत आहे. आजघडीला सर्वत्र इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला आहे. नर्सरीपासूनच चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे दिले जात असून मराठी व हिंदी शिक्षणाला बगल दिली जात आहे. हेच कारण आहे की, या शिक्षण प्रणालीत मराठी व हिंदी हा एक विषय बनून राहिला आहे. इंग्रजी शिक्षणाप्रती वाढत चाललेल्या या के्रजमुळे मराठी व हिंदी शाळा ओस पडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या बदलत्या शिक्षण प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रातच पूर्णपणे ढवळाढवळ झाली असून याचा परिणाम मात्र जुन्या परंपरा व सणांवर पडत असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की, हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी आहे. पाच दिवसांच्या या सणाची धामधूम तुळशी विवाहापर्यंत चालत होती. वर्षातील सर्वात मोठा हा सण फक्त हिंदू धर्मीयच साजरा करीत नसून सर्वच धर्मीयांचा हा सण म्हणून ओळखला जातो. यामुळेच या सणानिमित्ताने सहा माही परिक्षा घेतल्यावर दिवाळीच्या १५-२० दिवसांच्या सुट्या दिल्या जात होत्या. दिवाळीच्या या सुट्यांत आपल्या घरी दिवाळी साजरी केल्यावर मुले आपल्या मामाच्या घरीही जाऊन सुट्यांचा मनसोक्त आनंद घेत होते. काही वर्षांपूर्वी दिवाळी एक पर्वणी म्हणूनच विद्यार्थ्यांना लाभत होती. मत्र कालांतराने तीमाही व सहामही परिक्षांची जागा सेमीस्टर पॅटर्नने घेतली. शिक्षण प्रणाली बदलत गेल्याने पुस्तकांचा खच चिमुकल्यांच्या डोक्यावर आला व त्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे वाढले. अभ्यासाचा हा ताप एवढा वाढला की आता विद्यार्थ्यांना खेळणे-बागडण्यासाठी वेळच मिळत नसून पुस्तकातच डोके खुपसून ठेवावे लागत आहे. शिवाय सुट्यांतही होमवर्क दिला जात असल्याने सुट्या नावापुरत्यात ठरू लागल्या आहेत. शिवाय सुट्यांत कपात केली जात असून आता जेम-तेम ८-१० दिवसांच्या सुट्या दिल्या जात आहेत. कमी-कमी होत चाललेल्या या सुट्यांमुळे विद्यार्थ्यांत मात्र नाराजी दिसून येत आहे. तेवढीच नाराजी शिक्षकवर्गातही असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी शिक्षणात तरबेज होत असले तरी ते आपली परंपरा, सण व नातेवाईकांपासून दुरावत आहेत. (शहर प्रतिनिधी)
सुट्या फक्त १० दिवसांच्याच
By admin | Updated: November 16, 2015 01:42 IST